शस्त्राचा साठा, कुपवारात जप्त केलेले स्फोटके

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. लष्कराचे जवान सतत शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान, सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाला मोठे यश मिळाले आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील त्रेहगाम येथील दरिबल मरहामा भागातून पथकाने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. तथापि, या कारवाईपूर्वीच दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सीआरपीएफच्या युनिट इंटेलिजेंस सेलकडून (युआयसी) मिळालेल्या विशिष्ट माहितीनंतर, सीआरपीएफची 98 वी बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली. यादरम्यान दरिबल मरहामा परिसरातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. याप्रसंगी शोधादरम्यान, एक हँड ग्रेनेड, दहा एके-47 राउंड, एक टेलिस्कोप, सहा डेटोनेटर आणि पाकिस्तानी बनावटीचा बॅकपॅक जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचत होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचे नापाक नियोजन उधळून लावण्यात आले. या जप्तीमुळे परिसरातील संभाव्य दहशतवादी कारवाया उधळून लावण्यात आल्या आहेत. सध्या पुढील तपास सुरू करून आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

यापूर्वी ऑगस्टच्या सुरुवातीला कुपवाडा जिह्यातील कलारूस येथे बीएसएफ, लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत एका खडकाळ गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांचा अ•ा उद्ध्वस्त केला होता. यादरम्यान गुहेतून ग्रेनेड, पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. 4 ऑगस्ट रोजी कुपवाडा जिह्यातील कलारस येथे तीन दिवसांच्या संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांनी 12 चिनी ग्रेनेड, एक चिनी पिस्तूल आणि दारूगोळा, केनवुड रेडिओ सेट, उर्दूमध्ये लिहिलेले आयईडी बनवण्यावरील पुस्तक आणि फायर स्टिक्स जप्त केले होते.

दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत. यासोबतच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक कुरापतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Comments are closed.