सांगलीचा ‘चोरगणपती’ मंदिरात विराजमान

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस सांगलीकरांसाठी वेगळा असतो. कारण याचदिवशी सांगली संस्थानचा प्रसिद्ध ‘चोर गणपती’ मंदिरात गुपचूप येऊन विराजमान होतो. रविवारी याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सांगली संस्थानचे शासक श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही परंपरा सुरू केली. या गणपतीची मूर्ती कागदापासून तयार केलेली, अतिशय रेखीव व सुबक आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती मोठय़ा मिरवणुकीत न आणता, चोरून म्हणजेच गुप्त पद्धतीने मंदिरात आणली जाते. त्यामुळे या गणपतीला ‘चोरगणपती’ असे नाव प्रचलित झाले.
या परंपरेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या गणपतीचे विसर्जन होत नाही. इतर गणेशमूर्तींसारखी जलसमाधी न देता ही मूर्ती कायम मंदिरातच ठेवली जाते. अशाप्रकारे मूर्ती वर्षानुवर्षे मंदिरात विराजमान असून, गणेशभक्तांच्या दर्शनाला उपलब्ध राहते.
गणेशोत्सवकाळात ‘चोर गणपती’च्या दर्शनासाठी सांगलीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. भक्तांना या आगळ्यावेगळ्या परंपरेतून गणरायाचे दर्शन घेणे ही एक अनोखी अनुभूती वाटते. सांगली संस्थानच्या या विशेष परंपरेमुळे गणेशोत्सवाचा पहिला दिवस सांगलीकरांसाठी दरवर्षी खास ठरतो.
Comments are closed.