5 वर्षांनंतर आरसीबीमध्ये परतणार एबी डिव्हिलियर्स? दिग्गज फलंदाजाने सांगितला आपला प्लॅन
आयपीएल चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सर्वात मोठ्या मॅच विनर खेळाडूंमध्ये आजही एबी डिव्हिलियर्सचे नाव घेतले जाते. या खेळाडूने आपल्या जोरावर आरसीबीला अनेक सामने जिंकून दिले आहेत. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीला 5 वर्षे उलटून गेली तरीही फ्रँचायझीला त्यांच्या सारखा स्टार खेळाडू अद्याप सापडलेला नाही. दरम्यान सोशल मीडियावर एबी डिव्हिलियर्स आरसीबीमध्ये परतणार अशा बातम्या समोर आल्या, ज्यावर या दिग्गज फलंदाजाने आता स्वतःच उत्तर दिलं आहे.
आयपीएल 2021 नंतर एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतरपासूनच संघाला या सुपरस्टार खेळाडूची उणीव भासत आहे. आरसीबीमध्ये पुनरागमनाबाबत विचारले असता एबी डिव्हिलियर्सने आपल्या एका मुलाखतीत सांगितले,
‘कदाचित भविष्यात मी आयपीएलशी वेगळ्या भूमिकेत जोडला जाईन, पण पूर्ण हंगामासाठी व्यावसायिक पातळीवर बांधील राहणे खरंच कठीण आहे आणि मला वाटते की ते दिवस आता मागे पडले आहेत. पण तुम्ही कधीही “कधीच नाही” असे म्हणू शकत नाही. माझे मन आरसीबीसोबत आहे आणि कायम राहील. त्यामुळे जर फ्रँचायझीला वाटलं की माझ्यासाठी एखादी भूमिका आहे, आणि माझा वेळ योग्य असेल व मी तयार असेन, तर ती भूमिका नक्कीच आरसीबीसाठीच असेल.’
दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये खेळले आहे. त्यांनी एकूण 184 सामन्यांत 5162 धावा केल्या आहेत. या काळात एबीने 39.70 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर त्यांचा स्ट्राईक रेट 151.68 इतका होता. आरसीबीसाठी डिव्हिलियर्सने 157 सामने खेळले असून 41.10 च्या सरासरीने 4522 धावा जमवल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट 158.33 इतका राहिला आहे. एबीने आरसीबीसाठी 2 शतके आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत.
Comments are closed.