मुख्यमंत्रीच शब्द पाळत नसतील तर जनतेने आपली कैफियत कुणाकडे मांडायची ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील हिंजवडी परिसरातील रस्त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्या रस्त्याची वाईट अवस्था व्यवस्थित दिसून येत आहे. तब्बल दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यासाठी बैठक घेऊन 15 दिवसात रस्त्याची डागडुजी करू असे सांगितले होते. मात्र अद्याप तो रस्ता जसा होता तसाच आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना फटकारले आहे

हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक रोड परिसरातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. थोड्याबहुत फरकाने परिसरातील सर्वच रस्त्यांची हीच स्थिती आहे. विशेष म्हणजे 10 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन पुढील 15 दिवसांत म्हणजे साधारणतः 25 जुलैपर्यंत रस्त्यांची स्थिती सुधारण्याबाबत निर्णय घेणार असे सांगितले होते. याला आज दीड महिन्यांहून अधिक उलटून गेला आहे परंतु अद्यापही या भागातील रस्त्यांची स्थिती जशीच्या तशी आहे. शासनाने किमान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळायला हवा. कारण जनतेला मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा आधार असतो. हा शब्दच पाळला जाणार नसेल तर जनतेने आपली कैफियत कुणाकडे मांडायची ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Comments are closed.