बांधकामात फुटामागे पैसे नगररचना विभागाने घेतले! अनिलकुमार पवार यांचा कोर्टात दावा

नालासोपारातील 41 बेकायदा इमारत बांधकाम घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केलेले वसई-विरार महापलिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी यू टर्न घेतला आहे. या भ्रष्टाचाराशी माझा संबंध नाही. बांधकामात फुटामागे पैसे नगररचना विभागाने घेतले असे पवार यांनी न्यायालयात सांगितले.

ईडीने अनिलकुमार पवार, पालिकेचे निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यासह दोन भूमाफियांना 13 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. हे चौघे सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीच्या छापेमारीत अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकाच्या घरात दीड कोटी रुपये सापडले होते. पवार यांची पत्नी अनेक कंपन्यात संचालक आहे आणि भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा या कंपन्यांमध्ये पांढरा केल्याचा ईडीचा आरोप आहे.

ईडीने अटक करण्याची धमकी देऊन जबाब द्यायला भाग पाडले. पवार यांच्या घरी कोणतीही रोकड, दागदागिने किंवा सोने सापडले नाही, असे पवार यांचे वकील उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी न्यायालयात सांगितले. 41 इमारती 2008 ते 2021 या काळात बांधल्या आहेत. मी 2022 मध्ये आयुक्त झालो. बांधकामामागे प्रति चौरस फुट पैसे मला नाही तर नगररचना खात्याला मिळत होते, असा दावा पवार यांच्याकडून करण्यात आला.

पत्नीच्या कंपन्या कायदेशीर!

अनिल कुमार पवार यांच्या पत्नी भारती पवार या अनेक नातेवाईकांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार होत्या. मात्र कंपन्या 1997 ते 2019 दरम्यान स्थापन झालेल्या आहेत, असा दावाही पवार यांच्या वकिलांनी केला. पवार आयुक्त होण्याआधीपासून या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या आहेत. भारती पवार या जनार्दन ऍग्री, बीएसआर रिअल्टी, जे.ए. पवार बिल्डर्स आणि श्रुतिका एंटरप्रायझेस (अनिल कुमार पवार यांच्या मुलीची फर्म) या कंपन्यांमध्ये संचालक आहेत. त्यामुळे या कंपन्या लाचखोरीचे पैसे पांढरे करण्यासाठी निर्माण झाल्या असल्याचा आरोप चुकीचा आहे, पवार जामीन मागण्याचा पर्याय न निवडता त्यांच्या अटकेच्या कायदेशीरतेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पवार यांच्या वकिलांनी दिली.

Comments are closed.