गणपती बाप्पा मोरया…! घरातूनच गणरायाला निरोप, महापालिकेचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन मूर्ती नेणार
पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून डंपरमधील फिरते तलाव सोसायटय़ांच्या दारात नेऊन विसर्जनासाठी मूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या बाप्पाची ‘निरोपाची पूजा आणि आरती’ करून आपली मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. या ठिकाणीच मूर्तीचे शास्त्राेक्त पद्धतीने विसर्जन केले जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव निविघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा 24 तास कडक वॉच राहणार असून 11 हजार सीसीटीव्हा कॅमेरे लावण्यात आले आहेत, तर 15 हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवा दोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार सार्वजनिक मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. या मूर्ती विसर्जनासाठी एकाच वेळी हजारोंच्या संख्येने नैसर्गिक स्रोतांवर मूर्ती आणल्या जातात. यामुळे भाविकांचीही गैरसोय होते आणि नियोजन करताना पालिकेचे तारांबळ उडते. त्यामुळे आता डंपरमधील कृत्रिम तलावांची संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये पालिकेचे कर्मचारी सोसायटीच्या दारात येऊन विसर्जनासाठी मूर्ती स्वीकारणार आहेत.
आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे
गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळातील 1 हजाराहून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
2650 मंडळांना परवानगी
मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे 2625 अर्ज प्राप्त झाले असून परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
288 कृत्रिम तलाव
गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने मुंबईभरात 288 कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी भाविकांना पालिकेच्या ‘माय बीएमसी’ या अॅपवर घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. यानंतर पालिकेकडून संबंधितांना विसर्जनासाठी वेळ दिली जाईल. यामुळे विसर्जन विनाअडथळा पार पाडता येणार असल्याचे उपयुक्त आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.
गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेवर अतिरिक्त तिकीट सुविधा दक्षिण मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भक्त गर्दी करणार आहेत. त्या भक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त तिकीट सुविधा कार्यान्वित केली आहे. चिंचपोकळी, करी रोडबरोबरच भायखळा, परळ, दादर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे व पनवेल आदी रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 30 मोबाईल-यूटीएस यंत्रणा वितरित केल्या आहेत.
- शहरात 36 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक आयुक्त, दोन हजार 637 पोलीस अधिकारी, 14 हजार 430 अंमलदार असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय पोलिसांच्या जोडीला आरपीएफ, सीआरपीएफ, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बेट, होमगार्डदेखील तैनात असणार आहेत.
…तर संपर्क साधा
आम्ही आहोतच, शिवाय सीसीटीव्ही कॅमेरेदेखील आहेत. परंतु जनता हा आमचा तिसरा डोळा आहे. काही संशयास्पद दिसले, काही गडबड वाटली तर लगेच तैनात पोलिसांकडे अथवा 100/112 या क्रमांकावर संपर्क साधून कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईचा राजा आला!
‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेला गणेश गल्ली येथील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे सोमवारी पहिले दर्शन घडले. मुखदर्शनाचा क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी मंडपात झाली होती.
Comments are closed.