राजस्थानमधील पावसाने परिस्थिती खराब केली

गावांपासून शहरापर्यंत पाणी-पाणी; बचाव-मदतकार्यासाठी लष्करी जवान तैनात

► वृत्तसंस्था/ जयपूर

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील बहुतेक जिह्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर बनल्यामुळे मदत आणि बचावकार्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी हवाई दलाने आपले विमानही तैनात केले. कोटा, बुंदी, सवाई माधोपूर आणि झालावाड जिह्यात परिस्थिती सर्वात गंभीर आहे. हादोती प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अनेक गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली असून संपर्कही तुटला आहे. राजस्थानमध्ये पावसाळ्यात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 91 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूर पावसामुळे अलर्ट मोडवर आहे. जयपूरसह अनेक ग्रामीण भागात पुराचे पाणी साचण्याची परिस्थिती कायम आहे. गावांमधील रस्ते पूरमय झाल्यामुळे सामान्य लोकांना ये-जा करण्यात मोठी अडचण येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाने सोमवार आणि मंगळवारी जिह्यातील सर्व सरकारी आणि बिगरसरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुटी जाहीर केली आहे.

पुरामुळे बुंदीमधील परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अनेक लोक पुराच्या विळख्यात अडकून पडल्यामुळे बचावासाठी लष्करी जवान पाठविण्यात आले आहे. लष्करी जवानांच्या एका पथकाने सोमवारी बडा दांडला शहरातून महिला आणि मुलांसह 41 जणांना वाचवले. यानंतर, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत सैन्याचे आभार मानले.

Comments are closed.