जरांगेंचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम, उद्या मुंबईच्या दिशेने कूच करणार

आम्ही 27 ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहोत. सरकारच्या हातात 48 तास आहेत, निर्णय त्यांना घ्यायचा आहे अन्यथा 27 तारखेला आंतरवलीतून कूच करून 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू होईल आणि पुढील जबाबदारी सरकारची असेल, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी ठणकावले.

आंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावरून त्यांनी यावेळी फडणवीस सरकारवर प्रचंड आगपाखड केली. आम्ही आझाद मैदानावरील आंदोलनाची तारीख चार महिन्यांपूर्वीच जाहीर केली. सरकारकडे आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास अवधी होता. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आंदोलन सुरू करण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उरला नाही. ही परिस्थिती सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओढावली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीहून मुंबईकडे निघणार आहोत. अजूनही सरकारच्या हातात दोन दिवस आहेत. आम्ही न्याय मागत आहोत, सरकारने न्याय करावा, असे ते म्हणाले.

कामधंदा सोडा, मुंबईला चला

आझाद मैदानावरील आंदोलन ही मराठा आरक्षणासाठीची निकराची लढाई आहे. तेव्हा मराठा समाजाने कामधंदे बंद करावेत, व्यवसाय बंद करावेत, नोकरदारांनी काम बंद करावे आणि मुंबईकडे निघावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. आपल्या लेकराबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मराठा समाजाला हे आंदोलन यशस्वी करावेच लागेल, असेही ते म्हणाले.

जरांगे यांच्या मागण्या

  • मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे.
  • मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा. हैदराबाद, मुंबई, सातारा गॅझेटियर लागू करा.
  • सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी.
  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे ताबडतोब मागे घ्या.

असे जाणार मुंबईला

  • 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईकडे प्रयाण.
  • आंतरवाली, पैठण, शेवगाव, आळेफाटा, शिवनेरी मुक्काम.
  • 28 ऑगस्टला खेडमार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर.
  • 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 आझाद मैदानावर आंदोलन.-

काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना एकेरीवर येत अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी आपण कोणतेही अपशब्द वापरले नसल्याचा खुलासा केला असून, अनवधानाने काही बोललो असेन तर शब्द मागे घेतो, असेही ते म्हणाले.

फडणवीस, आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथून टाकेन!

मुंबईतील आंदोलनाची तारीख चार महिन्यांपूर्वीच जाहीर केली आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारकडे भरपूर वेळ होता. परंतु, सरकारने काहीही केले नाही. मुख्यमंत्री फडणवीस, आरक्षण द्या नसता सरकार उलथून टाकेन, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

Comments are closed.