केईएममधील प्लाझ्मा सेंटर बंद करण्याच्या हालचाली, तब्बल 3 कोटींची बिले रुग्णालय प्रशासनाने अडवली!

गरीब व गरजू रुग्णांना वेगवेगळ्या आजारांवरची औषधे स्वस्तात पुरवणारे केईएम रुग्णालयातील प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना, राज्य रक्त संक्रमण शिबीर व जननी शिशु सुरक्षा योजनेतून येणारी तब्बल 3 कोटींची बिले केईएम प्रशासनाने अडवून ठेवली आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, विद्यमान कर्मचाऱ्यांचा बोनसही प्रशासनाने अडवून ठेवला आहे. त्यामुळे कर्मचारी हवालदील झाले आहेत. सेंटर बंद करण्याचाच हा डाव असल्याचा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत ठराव होऊन 1988 साली केईएममध्ये नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर सुरू झाले. तत्कालीन महापालिका आयुक्त व केईएमच्या अधिष्ठाता यांच्यात या संदर्भात करार झाला होता. रक्तातील प्लाझ्मा वेगळा करून त्यापासून औषधे बनविण्याचे काम या सेंटरमध्ये चालते. ही औषधे सरकारी योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना स्वस्तात किंवा विनामूल्य दिली जातात. त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर हे सेंटर चालते. गेल्या 36 वर्षांपासून लाखो रुग्णांना प्लाझा सेंटरने आधार दिला आहे. असे असतानाही हे सेंटर बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे बाबा कदम म्हणाले.

महापालिकेत सामावून घेण्याची मागणी

प्लाझ्मा सेंटर हे विश्वस्त संस्थेमार्फत चालवले जाते. या संस्थेचे अध्यक्ष हे महापालिकेचे आयुक्त आहेत तर व्यवस्थापकीय विश्वस्त अतिरिक्त आयुक्त आहेत. संचालक म्हणून केईएमच्या डीन डॉ. संगीता रावत व रुग्णालायातील अधिकाऱ्यांवर प्रशासकीय जबाबदारी आहे. केईएम प्रशासन सेंटरशी काहीही संबंध नसल्याचे दाखवत आहे. वास्तविक, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याबाबत उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. ती लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी बाबा कदम यांनी केली आहे.

नियमानुसार पगार नाहीत, देणी रखडली!

प्लाझ्मा सेंटरमध्ये 18 कर्मचारी आहेत. त्यातील 13 कर्मचारी कायमस्वरुपी आहेत तर 5 कंत्राटी आहेत. त्यांचे पगारही वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार होत नाहीत. मागील वर्षीचे सानुग्रह अनुदानही देण्यात आलेले नाही. कंत्राटी कर्मचारी 20 ते 25 वर्षे सेवेत असूनही त्यांना कायम केले जात नाही. निवृत्त झालेल्या पाच कर्मचाऱ्यांना अद्याप त्यांची देणी मिळालेली नाहीत.

असा कुठलाही ऑफर नाही – संगीता रावत

केईएममधील प्लाझ्मा सेंटर बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. पुढच्या काही दिवसांत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यात काही गोष्टींवर चर्चा होणार आहे. कामगारांची देणी देण्याबाबतही याच बैठकीत चर्चा होईल, असे केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

Comments are closed.