पाकिस्तानला भारत पूर चेतावणी देईल
मानवतेच्या दृष्टिकोनातून ‘अलर्ट’ केल्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताकडून पाणी सोडले गेल्याने तावी नदीला पूर येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारताने पाकिस्तानला केला आहे, असा दावा पाकिस्तानी वृत्तमाध्यमांनी केला आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी 1960 मध्ये केलेला सिंधू जलवितरण करार स्थगित केला आहे. तरीही हा इशारा देण्यात आला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पहलगाम हल्ल्यानंतरचा हा भारताचा पाकिस्तानशी झालेला पाहिला महत्वाचा संपर्क आहे, असेही पाकिस्तानचे प्रतिपादन आहे. दरम्यान, मानवतेच्या दृष्टिकोनातून हा अलर्ट देण्यात आल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्याने तावी नदीच्या परिसरातील आपल्या नागरिकांना सावध केले आहे. तावी ही छोटी नदी असून ती भारतातून वाहून पाकिस्तानात सिंधू नदीला मिळते. भारताने सिंधू नदीवर वीजनिर्मितीसाठी बांधलेला धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यास तावी नदीला पूर येऊ शकतो. भारताकडून हा इशारा पाकिस्तानला इस्लामाबाद येथील उच्चायुक्तांकडून देण्यात आला आहे, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. तथापि, यावर अद्याप स्पष्टता आलेली नाही.
सिंधू जलवितरण करार काय आहे?
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जलवितरण करार करण्यात आला होता. या करारात जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. या करारानुसार रावी, सलतज आणि बियास या नद्यांचे पूर्ण पाणी भारतासाठी, तर सिंधू, चिनाब आणि झेलम यांचे 80 टक्के पाणी पाकिस्तानसाठी देण्यात आले होते. तथापि, हा करार करुन भारताने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली, अशी टीका त्यावेळी तत्कालीन नेते जवाहरलाल नेहरु यांच्या विरोधात झाली होती. हा करार त्यांनी भारताच्या संसदेला विश्वासात न घेताच केला होता, असेही एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या अभ्यासातून अलिकडच्या काळात उघड झाले आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी क्रूर आणि धर्मांध हल्ला केल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला असून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचा मार्ग सोडत नाही, तोपर्यंत हा करार पुनर्जिवीत केला जाणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच, या सर्व सहा नद्यांचे पाणी आडविण्याचीही व्यापक योजना सज्ज केली आहे.
Comments are closed.