2 लाख 27 हजार बाप्पांचे उद्या वाजतगाजत आगमन; 12 हजार पोलीस ‘ऑनट्युटी’ २४ तास, ठाणे, पालघर, रायगडात करडी नजर

अवघ्या दीनांचा नाथ असलेल्या लाडक्या बाप्पांचे आगमन आता काही तासांवर आले आहे. ढोलताशे सज्ज आहेत. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठाही फुलल्या असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस विभागात व प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे १२ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला असून गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनची करडी नजर राहणार आहे. तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण २ लाख २७ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवांना मोठी परंपरा असून कल्याण, ठाणे व अन्य गावांमधील देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. गणरायाचे आगमन व विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस खाते व प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी, ठाणे, कल्याण, उल्हासनगर व वागळे इस्टेट या झोनमध्ये १ लाख ५७ हजार ८४२ गणेशमूर्तीचे बुधवारी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. त्यात १ लाख ५६ हजार ७८२ घरगुती व १ हजार ६० गणपतींचा समावेश आहे.

  • ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ११ डीसीपी, २६ एसीपी, ५५ पीएसआय, ८०० होमगार्ड एवढा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. त्याशिवाय क्राइम ब्रँचची पथकेदेखील गस्त घालणार आहेत.
  • रायगड जिल्ह्यात १ लाख २ हजार ४८४ खासगी तसेच २८६ गणेशमूर्तीचे आगमन होणार आहे. पोलीस व होमगार्ड मिळून २ हजार ८८६ कर्मचारी २४ तास ऑनड्युटी आहेत.
  • पालघर जिल्ह्यामध्ये ९ हजार ७७६ खासगी व १ हजार ९९२ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी १ हजार ३०४ पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहापूरच्या ढोलताशा पथकाचा तरारारा आवाज दिल्लीत घुमणार

बाप्पांच्या उत्सवासाठी राजधानी दिल्लीदेखील सज्ज झाली असून यंदा शहापुरातील माहुली गर्जना ढोलताशा पथकाचा आवाज घुमणार आहे. या पथकामध्ये ३० वादक असून त्यात आठ मुलींचा समावेश आहे. गणपतीचे आगमन व विसर्जनाच्या दिवशी हे पथक आपल्या कलेची झलक दिल्लीकरांना दाखवणार असल्याची माहिती पथकप्रमुख सुमेध जाधव यांनी दिली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या फरीदाबाद मतदारसंघामध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी शहापूरच्या माहुली ढोलताशा पथकाला आमंत्रित केले आहे. यावेळी मिळणारे मानधन सामाजिक कार्यासाठी वापरले जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Comments are closed.