भारतावर काही तासांमध्ये 50 टक्के टॅरिफ लागू होणार, अधिकृत नोटिफिकेशन जारी, शेअर बाजार कोसळला

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये आपल्या देशाला पुन्हा महान बनवण्याचा चंग बांधला आहे. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध देशांवर टॅरिफ लादण्यात येत आहेत. भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे, ज्याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. अमेरिकेनं या संदर्भातील नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क लादलं जाईल. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करुन अप्रत्यक्षपणे यूक्रेन विरुद्ध त्यांना सहकार्य केल्याचा अमेरिकेचा दावा आहे.

अमेरिकेनं भारतावर पहिल्यांदा 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. ज्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली होती. आता 27 तारखेपासून 50 टक्के टॅरिफ लागू करण्यात येईल. यामुळं भारताच्या 7.3 लाख कोटी रुपयांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. यामध्ये कापड, रत्न, दागिने, सागरी उत्पादन, ऑटो पार्टस यासारख्या उद्योगांवर परिणाम होणार आहे.

भारत सरकारनं अमेरिकेचं पाऊल अयोग्य आणि अन्यायपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. विदेश मंत्रालयानं म्हटलं की भारत आपल्या ऊर्जेच्या गरजेचासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी रशियाकडून तेल खरेदी केली आहे. अमेरिकेनं पहिल्यांदा जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरतेसाठी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकेकून भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं जात असलं तरी भारत राजनैतिक चर्चा आणि निर्यातदारांना प्रोत्साहन देण्याबाबत योजना राबवत आहे. भारतानं सध्या अमेरिकेवर प्रत्युत्तर म्हणून टॅरिफ लादलेलं नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन टॅरिफ लागू होण्यापूर्वी स्पष्ट संदेश दिला आहे की भारत आपल्या अर्थव्यवस्थेच्या आणि निर्यातदारांच्या सुरक्षेसाठी योग्य पावलं उचलेलं. अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी आम्ही कोणताही आर्थिक दबाव आला तरी आमच्या मार्गावर चालत राहू, आज आत्मनिर्भर भारताला गुजरातमधून नवी ऊर्जा मिळत आहे, जो गेल्या काही दशकांच्या  मेहनतीचा परिणाम आहे, असं मोदी म्हणाले.

अमेरिकेनं भारतावर लादलेलं 50 टक्के टॅरिफ काही तासांमध्ये लागू होत असताना शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बाजार जाणकारांच्या मते गुंतवणूकदार अजून देखील वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये दुपारी 12.27 वाजता 524 अंकांची घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स निर्देशांक 81103 अंकांवर पोहोचला होता. तर, निफ्टी  50 मध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांक 163.60 अंकांच्या घसरणीसह 24805.75 अंकांवर पोहोचला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.