पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…गणपतीला पैठणी ना सही, पैठणी जॅकेटने मिळवा रॉयल लूक
गणेशोत्सव म्हटला की आनंद, पाहुणचार आणि सजावट यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिधान. या दिवसांत प्रत्येकालाच पारंपरिक पण हलके आणि सोयीस्कर कपडे हवेत. विशेषतः घरात सतत पाहुण्यांची ये-जा होत असते, पूजा, आरती, कार्यक्रम यासाठी तासन्तास तयारी चालू असते. त्यामुळे परिधान असा हवा जो आरामदायीही असेल आणि पारंपरिक लूकही देईल. (ganpati festival paithani jacket traditional look)
अशा वेळी पैठणी हा पर्याय सर्वात उठावदार ठरतो. पण फक्त साडीच नाही तर आजकाल पैठणीचे ड्रेस, गाऊन, कुर्ते, ब्लेझर्स आणि जॅकेट्स हे बाजारात खूप लोकप्रिय झाले आहेत. महिलांसाठीच नव्हे तर पुरुष आणि मुलांसाठीसुद्धा पैठणी जॅकेट्स सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे पूर्ण कुटुंब पारंपरिक थीममध्ये सजल्यास उत्सवाचा आनंद आणखी वाढायला मदत होईल.
पुरुषांसाठीही पैठणी जॅकेट्स
गणेशोत्सवात पुरुषांमध्येही पैठणीच्या जॅकेट्सची मागणी वाढली आहे. कुर्त्यावर पैठणीचं जॅकेट घातल्यास साध्या पोशाखालाही रॉयल आणि वेगळा लूक मिळतो. पूजा, आरती किंवा घरगुती कार्यक्रमात हा लूक कमालीचा उठून दिसतो.
महिलांसाठी पैठणीचे आधुनिक पर्याय
महिलांसाठी साडी हा नेहमीच आवडता पोशाख आहे. पण सतत धावपळीत साडीपेक्षा हलके कपडे अधिक सोयीचे ठरतात. अशावेळी पैठणीचे ड्रेस, गाऊन किंवा जॅकेट्स हे एक उत्तम पर्याय आहेत. हे कपडे घातल्यावर पारंपरिकता टिकून राहते आणि आरामात दिवसभर वावरणेही शक्य होते.
लहान मुलांसाठीही खास डिझाइन्स
आजकाल लहान मुलांसाठीही पैठणी जॅकेट्स, ड्रेस उपलब्ध आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने एकाच थीममध्ये कपडे परिधान केले तर गणेशोत्सव अधिक रंगतदार आणि उत्साही वाटेल.
पैठणीची ओळख आणि आजची क्रेझ
पैठणी ही फक्त पारंपरिक साडी नाही तर महाराष्ट्राची एक ओळख आहे. पदरावरचा मोर असो वा झगमगणारे रंग, पैठणी नेहमीच सण-उत्सवात खास मानली जाते. आता आधुनिक डिझाइन्स आणि ट्रेंडी कट्समुळे तरुणाईसुद्धा पैठणीकडे आकर्षित होत आहे.
या गणेशोत्सवात जर तुम्हाला आरामदायी पण तितकाच पारंपरिक आणि स्टायलिश लूक हवा असेल, तर पैठणी जॅकेट्स आणि ड्रेस हे उत्तम पर्याय आहेत. कुटुंबासह पैठणीच्या या खास परिधानात गणपती बाप्पाचं स्वागत करा आणि उत्सव अधिक रंगतदार करा.
Comments are closed.