रोहित-पाँटिंग किंवा कमिन्स नव्हे, आकाश चोप्राने ‘या’ खेळाडूला मानलं कसोटी क्रिकेटमधला सर्वात महान कर्णधार!

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी एका फायर राऊंड सेशन मध्ये मोठं विधान केलं. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की जागतिक क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात महान कसोटी कर्णधार कोण आहे, तेव्हा त्यांनी विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव सर्वात पुढे ठेवलं. यावेळी त्यांनी कोहलीला रिकी पाँटिंग, महेंद्रसिंह धोनी, बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स यांसारख्या दिग्गजांपेक्षाही वरचं स्थान दिलं.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग अनेक कसोटी मालिका जिंकल्या. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका आपल्या नावावर केली. त्याच्या कर्णधारपदात भारत कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक 1 झाला. फिटनेसवर भर, आक्रमक वृत्ती आणि विजयासाठीची भूक हे त्याच्या नेतृत्वाचे खास गुण ठरले आणि त्याने संघाला आत्मविश्वासी, लढाऊ कसोटी युनिट बनवलं.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 68 टेस्ट सामने खेळले. त्यापैकी 40 जिंकले, 11 बरोबरीत सुटले आणि 17 गमावले. कोहली जेव्हा भारताचा कसोटी कर्णधार झाला, तेव्हा टीम इंडिया सातव्या क्रमांकावर होती. परंतु त्याने राजीनामा दिला तेव्हा भारत पहिल्या क्रमांकावर होता.

एका वर्षात चार परदेशी कसोटी विजय: कोहली हा असा पराक्रम करणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला. 2021 मध्ये भारताने ब्रिस्बेन, लॉर्ड्स, ओव्हल आणि सेंचुरियन येथे विजय मिळवले. 2018 मध्येही त्याने जोहान्सबर्ग, नॉटिंघम, अ‍ॅडलेड आणि मेलबर्नमध्ये अशीच कामगिरी केली होती.

सेंचुरियन जिंकणारा आशियाई कर्णधार: कोहली सेंचुरियनमध्ये विजय मिळवणारा पहिला आशियाई आणि एकूण तिसरा कर्णधार ठरला. याआधी इंग्लंडचा नासिर हुसेन (2000) आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क (2014) यांनी हा पराक्रम केला होता.

SENA देशांत सर्वाधिक विजय मिळवणारा आशियाई कर्णधार: (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 23 सामन्यांत 7 विजय मिळवले (13 पराभव, 3 बरोबरी). हे आकडे आशियाई कर्णधारांसाठी सर्वोच्च आहेत. विदेशात खेळलेल्या 36 कसोटींपैकी16 जिंकण्याचा विक्रमही कोहलीने केला आहे.

सेंचुरियनमध्ये विजय मिळवणारा एकमेव भारतीय कर्णधार: सेंचुरियनमध्ये कसोटी विजय मिळवून देणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेने तिथे झालेल्या 27 सामन्यांपैकी 21 जिंकले होते.

दोन बॉक्सिंग डे टेस्ट जिंकवणारा एकमेव आशियाई कर्णधार: कोहलीने आपल्या टीमला दोन वेळा बॉक्सिंग डे कसोटी जिंकवून दिली आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी विजय मिळवणारा पहिला भारतीय कर्णधार: कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामने जिंकले. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला हा पराक्रम करता आला नव्हता.

Comments are closed.