नगरपालिकेच्या मर्यादेपासून 10 कि.मी.च्या आत टोल बूथ असू नये.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा निर्देश : नियमांचे पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोलनाक्यांवरून सातत्याने उपस्थित होणा प्रश्नांनंतर आता केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्रालयाने अधिकाऱ्यांकडून टोल नियमांचे पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर स्थापन केला जाऊ नये असा निर्देश दिला आहे. याचबरोबर टोलनाका पालिकेच्या हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरापर्यंत स्थापन केला जाऊ नये असे मंत्रालयाने बजावले आहे.
अनेक टोलनाके नियमांचे उल्लंघन करत आहेत. राष्ट्रीय महामार्ग वापरकर्ता शुल्क नियमांनुसार टोलनाका 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर उभारला जाऊ नये. तसेच हे टोलनाके पालिकेच्या हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरापर्यंत असू नयेत. परंतु अनेक टोलनाके या नियमांचे उल्लंघन करत आहेत. याचमुळे परिवहन मंत्रालयाकडून ही परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अनेक खासदारांनी संसदेत याप्रकरणी प्रश्न उपस्थित केल्याने रस्ते परिवहन मंत्रालयाने आता कठोर भूमिका घेतली आहे.
अधिकाऱ्यांना निर्देश
महामार्ग यंत्रणांनी संबंधित नियमांचे कठोरपणे पालन करावे असे परिपत्रकात म्हटले गेले आहे. तसेच प्रकल्पाला मंजुरी देताना टोलनाका नियमांनुसारच उभारला जाई हे पाहिले जावे असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच नियमांचे पालन झालेले नसल्यास अधिकाऱ्यांना त्यासंबंधी कारण सांगावे लागणार आहे. कारण सांगूनच टोलनाका 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर किंवा पालिकेच्या हद्दीपासून 10 किलोमीटरच्या कक्षेत स्थापना करता येऊ शकतो.
मूल्यांकन समितीसमोर प्रकरण मांडा
पूर्वीपासून उभारण्यात आलेले टोलनाके नियमांचे उल्लंघन करत असतील तर सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. अशाप्रकरणांमध्ये तरतुदीच्या विरुद्ध जात टोलनाका उभारणे अनिवार्य ठरल्यास आणि कुठलाही पर्याय नसल्यास विस्तृत अहवालासह टोलनाक्याच्या प्रस्तावित स्थानसंबंधी मूल्याकंन समितीसमोर हे प्रकरण उपस्थित करावे आणि रितसर लेखी स्वरुपात ते नोंदविण्यात यावे असे परिवहन मंत्रालयाने बजावले आहे.
Comments are closed.