रोहित-विराटला 200 कोटींचा फटका, आयपीएल करारांवरही परिणाम
भारत सरकारने ऑनलाइन गेमिंगवर कडक कायदा केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर, ड्रीम 11ला भारतीय संघाच्या प्रायोजकांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. आता कंपनी ऑनलाइन मनी गेम आणू शकणार नाही आणि सरकार या खेळांच्या प्रमोशनला परवानगी देत नाही.
केवळ भारतीय क्रिकेटपटूंच्या जर्सीवरच नाही तर आयपीएलमध्येही या खेळांचे प्रमोशन केले जाते. टीम इंडियाचे खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि इतर अनेक क्रिकेटपटू या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचे प्रमोशन करताना दिसले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनीही या खेळांचे प्रमोशन केले आहे.
टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचे प्रमोशन केले आहे आणि ते या प्लॅटफॉर्मवरून कोट्यवधी रुपये कमवत होते. पण आता सरकारने कठोर कायदे आणल्यानंतर, हे सर्व व्यवहार पूर्णपणे संपुष्टात येतील. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या हे खेळाडू ड्रीम11 चे प्रमोशन करत होते. मोहम्मद सिराज, शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे माय ११ सर्कल अॅपचे प्रमोशन करताना दिसले. विराट कोहली एमपीएलशी आणि एमएस धोनी विंझो अॅपशी संबंधित होता.
क्रिकबझच्या अहवालानुसार, कोहलीला एमपीएलच्या ब्रँड एंडोर्समेंटमधून दरवर्षी 175-200 कोटी रुपये मिळत होते. हे प्लॅटफॉर्म बंद झाल्यामुळे, विराटला पुढील वर्षापासून हे 200 कोटी रुपये मिळणार नाहीत. रोहित शर्माला ड्रीम 11 मधून 50-60 कोटी रुपये देखील मिळत होते, तर यावर्षी करार अर्धवट राहिल्याने रोहितला 6 ते 7 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे, टीम इंडियाचे सर्व खेळाडू ऑनलाइन मनी गेमिंगच्या ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कमाई करत होते, त्यामुळे आता यातून मिळणारे पैसे पूर्णपणे थांबले आहेत. परंतु याशिवाय भारतीय खेळाडू इतर अनेक ब्रँडचे प्रमोशन देखील करतात.
ऑनलाइन मनी गेमिंगवरील बंदीमुळे आयपीएललाही मोठा फटका बसला आहे. माय11 सर्कल हे आयपीएलमध्ये असोसिएट स्पॉन्सर आहे, ज्यामुळे बीसीसीआयला पूर्वी 125 कोटी रुपये मिळत होते. हा करार पाच वर्षांसाठी होता, ज्यापैकी फक्त दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांना दरवर्षी 10 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नवीन कायद्याच्या आगमनाने, केवळ जाहिरात उद्योगाला दरवर्षी सुमारे 8000 ते 10000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Comments are closed.