रोहित शर्माला वनडे टीममधून बाहेर काढण्यासाठी 'ब्रॉन्को टेस्ट'? माजी क्रिकेटपटूचा सनसनाटी दावा

टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिसत आहे. 38 वर्षीय रोहितचा उद्देश 2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपपर्यंत खेळत राहण्याचा आहे. मात्र त्यासाठी फिटनेस आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी निर्णायक ठरणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयने खेळाडूंसाठी नव्या प्रकारचा ‘ब्रॉन्को टेस्ट’ लागू केला आहे. या टेस्टवरून माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने मोठा दावा केला आहे.

मनोज तिवारीचे म्हणणे आहे की हा टेस्ट खास करून रोहित शर्माला 2027 वर्ल्ड कपच्या आधीच बाजूला करण्यासाठी आणण्यात आला आहे. त्याने स्पष्ट केले की, “रोहितची फिटनेस नेहमी चर्चेत राहते. तो फिट नसला तरी त्याच्या बॅटिंगसमोर अनेक गोलंदाज हतबल होतात. त्यामुळे अनफिट असूनही त्याला बेंचवर बसवणे कठीण जाते. म्हणूनच ब्रॉन्को टेस्टची अंमलबजावणी झाली आहे.”

तिवारी पुढे म्हणाला की, “विराट कोहलीला 2027 च्या वर्ल्ड कपच्या प्लॅनिंगमधून बाहेर ठेवणे शक्य नाही. पण मला शंका आहे की रोहितला यातून बाहेर केले जाईल. मी भारतीय क्रिकेटमध्ये काय चालू आहे याचा बारकाईने अभ्यास करतो. ब्रॉन्को टेस्ट हा रोहितसारख्या खेळाडूंना हळूहळू दूर करण्यासाठी आणला आहे.”

तिवारींनी या टेस्टच्या वेळेबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्याने सांगितले की, गेल्या वर्षी जुलैमध्ये गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला, तर जून महिन्यात नवीन फिटनेस कोच एड्रियन ले रॉक्स टीममध्ये सामील झाला. त्यानंतरच ब्रॉन्को टेस्ट लागू करण्यात आला. तिवारींचे म्हणणे आहे की, हा टेस्ट अत्यंत कठीण असून जर रोहितने आपल्या फिटनेसवर विशेष मेहनत घेतली नाही तर त्याच्यासाठी संघात जागा टिकवणे अवघड होईल.

तरीदेखील, तिवारीने या टेस्टचे समर्थन करताना म्हटले की, “ब्रॉन्को टेस्टमुळे खेळाडूंचा फिटनेस स्तर उच्च राहील, पण काही खेळाडूंना बाहेर करण्याचाही यात उद्देश असतो. 2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही सेहवाग, युवराज, गंभीर असे खेळाडू चमकत होते, तरीही त्यानंतर यो-यो टेस्ट आणण्यात आला. त्यामागेही अनेक कारणे होती.”

Comments are closed.