तीन वर्षांच्या चिमुकलीला कुशीत घेतलं; दोघींवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं; घरातून धुर निघताना शेज
जोधपूर: ग्रेटर नोएडामध्ये निक्कीच्या हत्याकांडानंतर आता हुंड्यासाठी आणखी एका महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. हुंड्याच्या छळाला ही महिला इतकी कंटाळली की तिने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्या लेकीसह आपल्या आयुष्याचा शेवट केला. राजस्थानमधील जोधपूरमध्ये ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शाळेतील शिक्षिकेने आपल्या चिमुकल्या लेकीसह टोकाचं पाऊल उचललं आहे. पीडितेचे नाव संजू बिश्नोई (32 वर्षे) आहे. संजूने तिच्या तीन वर्षांच्या मुलीला कुशीत घेऊन, स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. या घटनेत चिमुकल्या लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर संजूचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला, या घटनेनं मोठ्या प्रमाणावर संताप आणि दोन निष्पाप जिवांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
घरातून अचानक धूर निघायला लागला तेव्हा शेजारी घाबरले
याप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 22 ऑगस्ट रोजी घडली आहे. संजू बिश्नोईने स्वतःला आणि आपल्या लेकीसोबत पेटवून घेतले तेव्हा तिचा पती दिलीप बिश्नोई हा घरी नव्हता. घरातून अचानक धूर निघायला लागला तेव्हा शेजारी घाबरले आणि त्यांनी तातडीने महिलेच्या वडिलांना फोन केला.तिचे घरचे तिथे पोहोचेपर्यंत संजू होरपळलेली होती. तर, तीन वर्षांच्या मुलीने त्यांच्या डोळ्यासमोर जीव सोडला होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मंदोरचे एसीपी नागेंद्र कुमार यांनी माहिती देताना म्हटलं की, 3 वर्षाच्या मुलीचा मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचा शनिवारी जोधपूरमधील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी रविवारी स्थानिक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांनी आरोप करण्यात आला आहे की, त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता. या प्रकाराला कंटाळून त्यांच्या मुलीने मुलीसह आपलं जीवन संपवलं आहे.
पती, सासू, सासरे आणि ननंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती दिलीप बिश्नोई, सासू, सासरे आणि ननंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सासरच्यांनी आपल्या लेकीला जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी देखील मिळाली आहे. या चिठ्ठीमध्ये संजूने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजूचा मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे आणि तो तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.
मृत महिला सरकारी शाळेत शिक्षिका
संजू बिश्नोई ही 2021 पासून एका सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिचं लग्न 10 वर्षांपूर्वी दिलीप बिश्नोई यांच्यासोबत झालं होतं. तेव्हापासून तिचा पती आणि सासरचे लोक तिचा छळ करत होते. काही दिवसांपासून तिच्या सासरच्या लोकांशी तिचे सातत्याने वाद होत होते. शनिवारीही त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यामुळे संजू खूप संतापली होती, शाळेतून परतल्यानंतर तिने तिच्या मुलीला कुशीत घेतले आणि स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.