भारतावर आजपासून 50 टक्के ट्रम्प टॅरिफ लागू, भारताला फटका तर ‘या’ देशांना होणार फायदा
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. भारतानं रशियाकडून तेली खरेदी सुरु ठेवल्यानं ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला. 27 ऑगस्ट म्हणजेच आजपासून 50 टक्के टॅरिफ लागू झालं आहे. या निर्णयामुळं भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या 86 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीपैकी 60 अब्ज डॉलर्सची निर्यात प्रभावित होईल. याचा सर्वाधिक परिणाम मस्त्य उत्पादनं, कपडे, चामडे, रत्न आणि दागिने यासारख्या कामगारकेंद्री क्षेत्रांवर परिणाम होईल.
ट्रम्प टॅरिफचा या क्षेत्रांवर परिणाम (Trump Tariff Impact on this Sector)
अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा थेट परिणाम कापड क्षेत्रावर होईल. या क्षेत्रातून अमेरिकेला 10.3 अब्ज डॉलर्सची निर्यात होते. रत्न आणि दागिने उद्योगाला देखील याचा मोठा फटका बसणार आहे. या उद्योगासाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे.
झींगा आणि सागरी उत्पादनांपासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होणार आहेत चामडे आणि शूज, चपला निर्मितीवर उद्योगावर देखील उत्पादन थांबवण्याची आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची वेळ येऊ शकते. फर्निचर सारख्या उद्योगावर देखील परिणाम होऊ शकतो.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या रिपोर्टनुसार अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळं सध्याच्या निर्यातीपैकी एकूण 66 टक्के निर्यातीवर परिणाम होईल. 27 ऑगस्टपासून 60.2 अब्ज डॉलर्सच्या किमतीच्या निर्यातीवर 50 टक्के टॅरिफ अमेरिका आकारेल. यामध्ये कापड, रत्न आणि झींगा याचा समावेश आहे.
भारतावरील ट्रम्प टॅरिफचा ‘या’ देशांना फायदा
जीटीआरआयचे सह संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी म्हटलं की भारताला गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठा व्यापारी धक्का आहे. आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 49.6 अब्ज डॉलर्सपर्यंत कमोही होऊ शकते. भारतावरील टॅरिफमुळं चीन, व्हिएतनाम, मेक्सिको, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ आणि केनिया या देशांना फायदा होईल.
दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु असताना भारतानं रशियाकडून तेल खरेदी केल्यानं भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्यानंतर पुन्हा 25 टक्के टॅरिफची घोषणा करत त्याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून होईल असं सांगितलं होतं. गेल्या अनेक वर्षांमध्ये अमेरिकेकडून भारतावर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं गेलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा पुन्हा दावा केला आहे. भारतावर डोकं गरगरेल इतकं टॅरिफ लावण्याची धमकी युद्ध थांबवण्यासाठी दिली होती, असं ट्रम्प म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.