अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, शेअर बाजारात कोणत्या स्टॉकवर दबाव राहणार?
नवी दिल्ली : भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. या टॅरिफची आजपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवल्यानं हे टॅरिफ लावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अमेरिकेनं आजपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लागू केलं आहे. भारतीय शेअर बाजार आज गणेश चतुर्थीनिमित्त बंद असल्यानं बाजारावर आज परिणाम दिसून आला नाही. मात्र, उद्या शेअर बाजार सुरु होईल तेव्हा त्यावर परिणाम दिसून येईल.
जाणकारांच्या मते अमेरिकेच्या टॅरिफचा भारतातील वस्त्रोद्योग, दागिने आणि रत्न, सागरी उत्पादनांवर होईल. अमेरिकेनं पहिल्यांदा भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी केल्यानं 25 टक्के वाढ करण्यात आली. आता एकूण 50 टक्के टॅरिफ लागू केलं जाणार आहे.
शेअर बाजारावर परिणाम दिसणार
भारतीय शेअर बाजार आज गणेश चतुर्थीनिमित्त बंद होता. यामुळं आज ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसून आला नाही. बाजार विश्लेषकांच्या अंदाजानुसार गुरुवारी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळू शकतं.
जियोजीत इन्वेस्टमेंटसचे मुख्य रणनीतीकार वी.के. विजयकुमार यांच्यामते बाजार सुरु झाल्यानंतर घसरण पाहायला मिळू शकते. मात्र, गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही. कारण, त्यांना यापूर्वीच टॅरिफमधील वाढीची अपेक्षा होती. मास्टर ट्रस्ट ग्रुपचे संचालक पुनीत सिंघानिया यांनी आयात निर्यात आधारीत उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉकवर परिणाम होऊ शकतो.औषध निर्मिती कंपन्या आणि आयटी क्षेत्रातील स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी आकर्षण राहू शकतं.
ट्रेडजिनीचे सीओओ त्रिवेश डी.के. यांच्या नुसार उच्च टॅरिफमुळं निर्यात आधारित क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. भारताच्या एकूण निर्यातीपैकी 20 टक्के निर्यात अमेरिकेला होता. त्यामुळं अमेरिकेनं लादलेलं टॅरिफ भारतीय निर्यातदारांना चिंतेचं कारण बून शकतं.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा केला. युद्ध न थांबवल्यास डोकं गरगरेल इतकं टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती, असंही ट्रम्प म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या काळात 15 कोटी डॉलर्सची विमानं पाडली गेली होती, असं ट्रम्प म्हणाले.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.