आपण चौकशी करू किंवा प्रतिज्ञापत्र विचारू शकाल का?
निवडणूक आयोगाला उद्देशून राहुल गांधींचा सवाल : ‘अनोळखी’ पक्षांना 4300 कोटीच्या देणगीचे प्रकरण
वृत्तसंस्था/ मुजफ्फरपूर
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये काही राजकीय पक्षांना कथित स्वरुपात शेकडो कोटी रुपयांची देणगी मिळाल्याच्या वृत्ताचा दाखला देत बुधवारी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आणि याप्रकरणी चौकशी करणार का पुन्हा प्रतिज्ञापत्र मागणार असा सवाल केला आहे. गुजरातमध्ये काही असे अनोळखी राजकीय पक्ष आहेत, ज्यांचे नाव कुणीच ऐकलेले नाही, परंतु त्यांना 4300 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. या पक्षांनी अत्यंत कमीवेळा निवडूक लढविली आहे किंवा त्याकरता खर्च केला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी एका हिंदी वृत्तपत्रात प्रकाशित वृत्ताचा दाखला देत म्हटले आहे. हे हजारो कोटी रुपये कुठून आले? हे राजकीय पक्ष कोण चालवत आहेत आणि हा पैसा नेमका कुठे गेला असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग याप्रकरणी चौकशी करणार का पुन्हा याप्रकरणीही प्रथम प्रतिज्ञापत्र मागणार? किंवा कायदाच बदलून टाकणार, जेणेकरून डाटाही लपविला जाऊ शकेल अशी उपरोधिक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे.
गुजरातमध्ये नोंदणीकृत 10 पक्षांना 2019-20 आणि 2023-24 दरम्यान एकूण 5 वर्षांमध्ये एकूण 4300 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यादरम्यान झालेल्या एकूण तीन निवडणुकांमध्ये (दोन लोकसभा निवडणूक-2019 आणि 2024 तसेच 2022 ची विधानसभा निवडणूक) या 10 राजकीय पक्षांनी केवळ 43 उमेदवार उभे केले होते आणि त्यांना केवळ 54,069 मते मिळाली होती.
खर्च झाले 39 लाख रुपये, ऑडिटमध्ये 3500 कोटी दाखविले
या राजकीय पक्षांचा निवडणूक खर्च केवळ 39.02 लाख रुपये झाला, तर लेखापरीक्षण अहवालात निवडणूक खर्च 3500 कोटी रुपये दाखविण्यात आला, ज्या 10 राजकीय पक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यात लोकशाही सत्ता पक्ष, भारतीय नॅशनल जनता दल, स्वतंत्र अभिव्यक्ती पक्ष, न्यू इंडिया युनायटेड, सत्यावादी रक्षक पक्ष, भारतीय जनपरिषद, सौराष्ट्र जनता पक्ष, जनमन पक्ष, मानवाधिकार नॅशनल पक्ष आणि गरीब कल्याण पक्षाचे नाव सामील आहे.
गरिबांची मते चोरणे हेच गुजरात मॉडेल : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये बरसले राहुल गांधी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘वोटर अधिकार यात्रा’ मुजफ्फरपूर येथे पोहोचली असून तेथे त्यांनी एका सभेला संबोधित केले. देशात गुजरात मॉडेल सुरू आहे. गुजरात मॉडेल ‘चोरीचे मॉडेल’ आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात ‘वोट चोरी’ झाली असून देशात वोट चोरी केली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप पुढील 40 वर्षांपर्यंत सत्तेवर राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. राजकारणात उद्या काय घडेल हे कुणी जाणत नाही, परंतु अमित शाह यांना पुढील 40 वर्षांचे भविष्य कसे माहित? वोटचोरीमुळे त्यांना हे माहित असावे, अशी उपरोधिक टिप्पणी राहुल गांधी यांनी केली. 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये ओपिनियन पोलचे निष्कर्ष वेगळे हाते, परंतु नरेंद्र मोदी हे निकालापूर्वीच 300 जागा येणार असे म्हणत होते आणि तसेच घडले. हे वोटचोरीचे मॉडेल गुजरातमधून सुरू झाले आणि 2014 नंतर याला राष्ट्रीय स्तरावर आणले गेले. पूर्वी यासंबंधी पुरावे नसल्याने काही बोललो नव्हतो. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकात मतदारयादी आणि व्हिडिओ रिकॉर्डिंगमुळे मोठ्या प्रमाणावरील गडबड समोर आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणुकीची चोरी झाली असून याचा पुरावा मी देणार आहे. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला एक मताचा अधिकार दिला आहे. परंतु बिहारमध्ये 65 लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. याचा सर्वाधिक प्रभाव दलित, मागास, अल्पसंख्याक आणि गरीबांवर पडला आहे. तर श्रीमंतांची मते सुरक्षित राहिल्याचे राहुल गांधी म्हणाले.
Comments are closed.