गणेश चतुर्ती यांनी देशभरातील उत्साहाने साजरा केला

प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा, अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक उत्सवाचाही झाला प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

श्रीगणेश चतुर्थीचा सण साऱ्या देशात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्राप्रमाणे भारताच्या बहुतेक सर्व राज्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे वैशिष्ट्या असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवालाही या दिवसापासून प्रारंभ झाला असून अनेक राज्यांनी आता ही परंपरा स्वीकारली आहे. देशातील प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्ये गणेश दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बुधवारी पहावयास मिळाले. हा सण दीड दिवसापासून 11 दिवसांपर्यंत साजरा करण्यात येतो. काही स्थानी तो त्याहीपेक्षा अधिक दिवस चालतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणानिमित्त समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. इतर अनेक नेत्यांनीही शुभेच्छा संदेश दिले आहेत.

बुधवारी सकाळपासूनच देशातील कोट्यावधी घरांमध्ये श्रीगणेशमूतीँची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आदि राज्यांमध्येही हा सण लोकप्रिय आहे. घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरुपात तो मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.

मोठ्या शहरांमध्ये धामधूम

मुंबईप्रमाणेच हैद्राबाद, बेंगळूर, विशाखापट्टण, बडोदा, दिल्ली, भोपाळ, सुरत इत्यादी महानगरांमध्येही सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ बुधवारी भव्य स्वरुपात करण्यात आला आहे. अनेक महानगरांमध्ये सहस्रावधी मंडपांमध्ये बुधवारी प्रात:कालापासून संध्याकाळपर्यंत गणेशमूर्तींची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पारंपरिक उत्साहात पार पडला. यापुढचे 10 दिवस, अर्थात पुढच्या शनिवारपर्यंत ही धूम चालणार आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

गणेशचतुर्थीच्या निमित्ताने कोट्यावधी हिंदूंनी व्हॉटस अप आदी डिजिटल माध्यमांमधून आपल्या मित्र-मैत्रिणींना, आप्तस्वकीयांना आणि प्रियजनांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक स्थानी मिठाईचे वाटपही करण्यात आले. अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, विविध संस्था, आस्थापने आणि अशा अनेक स्थानांमध्येही हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी

भगवान गणेशाच्या आगमनाच्या निमित्ताने देशात असंख्य घरांमध्ये सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. तर सार्वजनिक स्थानी भव्य मंडप उभे करण्यात आले असून त्यांच्यात गणपतीबाप्पांना विराजमान करण्यात आले आहे. सजावट, विद्युत रोषणाई प्रमाणेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येत असून बाळगोपाळांपासून युवक-युवती आणि वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा या उत्सवामध्ये उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे. पावित्र्य आणि मांगल्याच्या या उत्सवाच्या आनंदामध्ये सारा देश न्हाऊन निघत आहे.

अन्य सहा देशांमध्येही गणेशोत्सव

गणेशचतुर्थी आणि गणेशोत्सव केवळ भारतात नव्हे, तर जगातील अन्य सहा देशांमध्येही भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. प्राचीन काळापासून ज्या देशांमध्ये हिंदू संस्कृती रुजली आहे. अशा सर्व देशांमध्ये हा सण पारंपरिक उत्साहात आणि दिमाखदारपणे मानण्यात येतो. नेपाळमध्ये तो विनायक चतुर्थी या नावाने साजरा होतो. नेपाळमध्येही तो भारताप्रमाणेच घरगुती स्वरुपात गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करुन साजरा करण्यात येतो. इंडोनेशियातही तो मोठ्या प्रमाणात साजरा होतो. विशेषत: या देशाच्या बाली बेटांमध्ये तो भारताप्रमाणेच मानला जातो. थायलंड देशात तो ‘फ्रा फिकानेत’ या नावाने केला जातो. जपानमध्ये तो ‘कांगितेन’ या नावाने साजरा केला जातो. येथे भगवान गणेश पावित्र्य आणि भरभराटीचे प्रतीक मानण्यात येतात. कंबोडिया या देशात या सणाचा प्रारंभ खामेर राजवटीत करण्यात आला. तेव्हापासून आज 1 हजार 500 वर्षे तो येथे साजरा केला जात आहे. मलेशियातही तो तेथील हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अशा प्रकारे भगवान गणेश सारे जग व्यापून राहिले आहेत.

पावसातही प्रचंड उत्साह

ड यंदा गणेशोत्सव काळात देशभरात मोठा पाऊस असूनही अमाप उत्साह

ड महाराष्ट्राप्रमाणेच इतर अनेक राज्यांमध्येही हा सण सार्वजनिक स्वरुपात

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या या सणासाठी शुभकामना

Comments are closed.