राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानीसाठी अहमदाबादची दावेदारी, केंद्रीय मंत्रिमंडळाने यजमानपदाच्या बोली प्रस्तावाला दिली मंजुरी

हिंदुस्थानने २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी अधिकृतपणे दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या स्पर्धेच्या यजमानपदाच्या बोली प्रस्तावाला मंजुरी दिली. यापूर्वी १४ ऑगस्टला हिंदुस्थान ऑ लिम्पिक संघटनेने (आयओए) यास मान्यता दिली होती. आता हिंदुस्थानला ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम बिडिंग प्रस्ताव सादर करावा लागेल. २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला मिळणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरपर्यंत होईल.

कॅनडाने शर्यतीतून माघार घेतल्याने हिंदुस्थानच्या दावेदारीची शक्यता अधिक बळकट झाली आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेचे संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखालील टीमने अहमदाबादमधील प्रस्तावित क्रीडा मैदानांची पाहणी केली होती. यावेळी गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांशीही बैठक झाली.

ऑलिम्पिकसाठीही हिंदुस्थानचा दावा

हिंदुस्थान २०३६ च्या ऑलिम्पिकसाठीही तयारी करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानने औपचारिक दावेदारी सादर केली होती. २०२८ चे ऑ लिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये, तर २०३२ चे ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे होणार आहेत.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बिडिंगचे ५ टप्पे

यजमान होऊ इच्छिणाऱ्या शहराला (देशाला) राष्ट्रकुल क्रीडा संस्थेकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्या देशाची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती प्रस्तावास मंजुरी देते. देशाच्या सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर अंतिम बिडिंग सादर केले जाते. राष्ट्रकुल क्रीडाचे अधिकारी यजमान शहर व क्रीडा मैदानांची पाहणी करतात. सर्व दावेदारांची तपासणी झाल्यावर राष्ट्रकुल क्रीडाच्या सर्वसाधारण बैठकीत अंतिम यजमान जाहीर करते.

Comments are closed.