आशिया कपच्या प्रोमोने पेटवला वाद; ‘बहिष्कार’च्या हाकांमध्ये वीरेंद्र सेहवागवरही निशाणा
आशिया कपला आता अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. पण त्याआधीच स्पर्धेच्या अधिकृत प्रसारकाने (Sony Sports Network) जारी केलेल्या एका प्रोमोवर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रोमो जरी आशिया कपसाठीचा असला तरी संपूर्ण लक्ष भारत-पाकिस्तान या चिरप्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यावर केंद्रीत केले आहे. 14 सप्टेंबरला होणाऱ्या या लढतीची रंगत वाढवण्याचा प्रयत्न यातून केला गेला. मात्र, आता तोच प्रोमो उलट आयोजकांवरच बुमरँग ठरला आहे.
मोठ्या प्रमाणावर नेटकरी आशिया कपच्या बहिष्काराची मागणी करत आहेत. सामना होणारच आहे कारण भारत सरकार फक्त द्विपक्षीय मालिकेला विरोध करते; मात्र बहुपक्षीय स्पर्धा यात अपवाद आहे. त्यामुळे आता ‘आशिया कप पाहू नका’ असा ट्रेंड सुरू झाला आहे. या प्रोमोमध्ये माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही दिसत असल्याने तोही चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. अनेकांनी त्याला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या त्याच्या पोस्टची आठवण करून दिली आणि कडवे हल्ले चढवले.
प्रसारकाने प्रसिद्ध केलेल्या या प्रोमोमध्ये भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रीदी आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दिसतात. यात एक भारतीय मुस्लिम कुटुंब भारत-पाक सामना टीव्हीवर पाहताना दाखवले आहे. रोमांचाच्या क्षणी कुटुंबप्रमुख भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतात आणि ती कबूल झाल्यावर घरात जल्लोष होतो. शेवटी सेहवाग ‘रग-रग में भारत’ असा संदेश देत स्पर्धेचं प्रमोशन करतो.
भारत-पाक सामन्यांची नेहमीच वेगळीच उत्सुकता असते. आयोजक आणि प्रायोजक त्याचा फायदा घेतात. मात्र, या वेळचा वाद पाकिस्तानशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उसळला आहे. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण भारतीय सेनेने तो हाणून पाडला. त्यानंतर भारतीय प्रत्युत्तर हल्ल्याने पाकिस्तानचे अनेक लष्करी ठिकाणे आणि एअरबेस मोडीत काढले. शेवटी पाकिस्तानला युद्धविरामाची मागणी करावी लागली.
या पार्श्वभूमीवर अनेक युजर्सना हा प्रोमो पाहून तीव्र संताप आला आहे. त्यांच्यानुसार हा ‘देशाच्या शहीदांचा आणि पीडितांचा अपमान’ आहे. बीसीसीआय, प्रसारक आणि आयोजक यांच्यावर ‘पैशासाठी राष्ट्रीय भावना तुडवल्या’ असा आरोप होत आहे. #BoycottAsiaCup असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
प्रोमोमध्ये सहभागी झाल्याने वीरेंद्र सेहवागवरही टीका होत आहे. त्यानेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून देत यूजर्स आता प्रश्न उपस्थित करत आहेत. काहींनी त्याच्या विरोधात अतिशय स्तरहीन भाष्यही केले आहे.
Comments are closed.