‘ठाकरे महाराष्ट्राचे शिल्पकार, शेलार-फडणवीस मुंबईत अभिमानाने वावरताहेत ही ठाकरेंचीच कृपा, अन्यथा…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून दोन भाऊ एकत्र आले. त्यांना अशीच सुबुद्धी मिळत राहो, असे भाष्य केले. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे महाराष्ट्राचे शिल्पकार असून ते कायम बुद्धी घेऊनच जन्माला आलेले असतात, असा टोला राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी काल शुभेच्छा दिलेल्या आहेत. दोन भाऊ एकत्र राहावेत असे त्यांना खरोखर मनापासून वाटते. मला खात्री आहे, काल स्वत: फडणवीस राज ठाकरे यांच्या गणरायाच्या दर्शनाला गेले, तिथे हात जोडले. तिथेही त्या गणरायाकडे तीच इच्छा व्यक्त केली असेल की, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रावर जे राजकीय संकट आहे ते दूर करण्यासाठी गणरायाने दोन्ही ठाकरे बंधुंना बळ द्यावे, शक्ती द्यावी. फडणवीस यांची हीच भूमिका असावी, असे संजय राऊत म्हणाले.

ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, शेलार-फडणवीस नाही. ठाकरेंची परंपरा महाराष्ट्रात फार मोठी आहे. तशी शेलार-फडणवीस यांची आहे का? अजिबात नाही. ठाकरे हे कायम सुबुद्धी घेऊनच जन्माला आलेले असतात. महाराष्ट्राच्या कल्याणासाठीच शिवसेना आणि ठाकरे यांचे कार्य सतत सुरू असते. आज शेलार, फडणवीस मुंबईमध्ये अभिमानाने वावरताहेत ही ठाकरेंची कृपा आहे, हे ऋण त्यांनी मान्य केले पाहिजे. नाही तर त्यांना कबुतर हाकायला गुजरातला जावे लागले असते, असा टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशाचा ठाकरे हाच ब्रॅण्ड आहे. ठाकरेंशिवाय महाराष्ट्र एक पाऊलही पुढे जाणार नाही. जसे महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले हा जो मंत्र आहे तो मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले यासाठी ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे.

मुंबईत लोक कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलनाचा अधिकार! – संजय राऊत

शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांबाबत विचारले असता ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या बाबतीत कुणी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना माहिती आहे काय होणार आणि काय सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते जरी असले तरी सगळ्यात आधी ते भाऊ आहे. त्यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा आणि बळकटी मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना असल्याने हा गणेशोत्सव त्यांच्यासाठी अधिक आनंद घेऊन आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले

Comments are closed.