श्री गजानन महाराजांच्या 115 व्या पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय सांगता

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या ११५ व्या पुण्यतिथी उत्सवाचा समारोप भक्तिमय वातावरणात झाला.

श्री गजानन महाराज संस्थानतर्फे २४ ते २८ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत सकाळी काकडा आरती, भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन यांसारखे कार्यक्रम पार पडले. सप्ताहात ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे, पुसद, ह.भ.प. भरत बुवा जोगी, परळी, ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, सिरसोली. ह.भ.प. भरत बुवा पाटील, म्हैसवाडी, ह.भ.प. बाळु बुवा गिरगांवकर, गिरगांव आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले. श्री गणेशयाग व वरूणयागास भाद्रपद शु. १ ला प्रारंभ होवून भाद्रपद शु. ५ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती झाली. तसेच श्रींचे समाधी सोहळ्या निमित्य श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला. २८ ऑगस्ट रोजी श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष धार्मिक विधी पार पडले. सकाळी १० वाजता पूर्णाहुती व अवभृत स्नान करण्यात आले.

महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ४६२ भजनी दिंड्यांनी सहभाग घेतल्याने संतनगरीत भक्तीमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण ७३ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकर्‍यांची भोजनप्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली. दरम्यान, संस्थानकडून भाविकांसाठी दर्शन, महाप्रसाद व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उत्सव काळात श्री शेगावसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा समाधि उत्सव संपन्न होऊन १,१८,००० चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अशारितीने श्रीकृपेने वारकर्‍यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे, असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे व मंदिराचे दर्शन घेत आशीर्वाद लाभला.

Comments are closed.