‘मी क्रिकेट सोडणार होतो’, मोहम्मद शमीच्या निवृत्तीबाबत माजी गोलंदाजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा!
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) याबाबत भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. भरत यांनी सांगितलं की, एक काळ असा आला होता जेव्हा शमी निवृत्ती घेण्याच्या विचारात होता. 2018 च्या इंग्लंड दौऱ्याच्या सुमारास शमी वैयक्तिक अडचणींमुळे खूप त्रस्त होता.
फिटनेस टेस्ट नापास झाल्यामुळे आणि संघातून ड्रोप झाल्यानंतर शमी म्हणाला होता की, तो क्रिकेट कायमचं सोडणार आहे. मात्र भरत अरुण आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांच्या योग्य निर्णयांमुळे शमीचं करिअर वाचलं आणि अकाली संपुष्टात आलं नाही.
भरत अरुण यांनी टाइम्स इंटरनेटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, जेव्हा शमी आयुष्यातील वैयक्तिक अडचणी आणि मानसिक त्रासातून जात होता, तेव्हा रवि शास्त्री त्याच्याशी बोलले आणि म्हणाले की तुला कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज असेल तर नक्की सांग. 2018 च्या इंग्लंड दौऱ्याआधी आम्हाला अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा होता. त्या वेळी शमी फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही आणि त्याला संघातून वगळलं गेलं. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचाही त्याला मोठा ताण होता. अशा अवस्थेत तो माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, ‘पाजी, मी क्रिकेट सोडणार आहे.’”
माजी गोलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, मी शमीला विचारलं, क्रिकेट सोडल्यानंतर तू काय करशील? आज तू जे काही आहेस किंवा जे काही कमावलंस ते सगळं क्रिकेटमुळेच आहे. त्यावर शमी म्हणाला की तो खूप रागात आहे. मग मी त्याला रवि शास्त्रींकडे नेलं. शास्त्रींनी त्याला सांगितलं, ‘जर तुला राग आला आहे आणि तुझ्या हातात चेंडू आहे, तर तो राग तू बॉलिंगमध्ये उतरव. तू क्रिकेट सोडू इच्छितोस कारण तुझं शरीर फिट नाही? मग आपण त्यावर काम करुया.
यानंतर आम्ही शमीला एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) मध्ये पाठवलं आणि स्पष्ट सांगितलं की, त्याच्या गोलंदाजीवर नव्हे तर फक्त फिटनेसवर काम केलं जाईल. तीन आठवड्यांनी शमीने मला फोन करून सांगितलं, ‘पाजी, आता मी घोड्यासारखा धावत आहे.
Comments are closed.