मराठ्यांचा एल्गार! आता आरक्षणाशिवाय हटणार नाही!! शिवनेरीवरून रणशिंग फुंकले… जरांगेंसह हजारो आंदोलकांची मुंबईत धडक

छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आज महायुती सरकारविरोधात रणशिंग फुंकले. आता मागे हटणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा वज्रनिर्धार करून जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कुच केले. मराठ्यांचे हे वादळ कोणत्याही क्षणी मुंबईवर धडकण्याच्या शक्यतेने पोलिसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे बुधवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जरांगे यांचा मोर्चा अहिल्यानगर जिह्यात शेवगाव येथे रात्री दहाच्या सुमारास दाखल झाला. वाटेत हजारोंच्या संख्येने थांबलेल्या मराठा बांधवांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जरांगे यांचा मुक्काम जुन्नरमध्ये होता. मात्र अनेक ठिकाणी होणारे स्वागत, प्रचंड गर्दी यामुळे जुन्नरमध्ये पोहोचेपर्यंत त्यांना पहाट झाली.

मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल होताच तिथे लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला. ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणांनी संपूर्ण शिवनेरी परिसर दणाणून गेला. ट्रक, टेम्पो, जीप आणि दुचाकीमधून आंदोलकांचे जथेच्या जथे जुन्नरमध्ये दाखल झाले. मुस्लिम बांधवदेखील त्यांच्या स्वागतामध्ये सहभागी झाले होते. शिवनेरीच्या पायथ्यापासून जरांगे यांच्यासोबत आंदोलक पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवाई मंदिरापर्यंत सहभागी झाले. शिवाई देवीची आरती आणि अभिषेक करून जरांगे यांचा ताफा किल्ले शिवनेरीवर पोहचला. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी जरांगे नतमस्तक झाले.

सरकार मराठा समाजाचा अपमान करत आहे

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस सरकार मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाविरोधात आडमुठी भूमिका सोडून द्या. गरीब मराठ्यांचा अपमान करू नका, सन्मान करा. मराठ्यांची मने जिंका. मराठे तुम्हाला कधीही विसरणार नाहीत.’

आता मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसायचं नाही, असे समाजाला आवाहन करताना जरांगे म्हणाले की, ‘शिवनेरीच्या पायथ्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनासाठी परवानगी मिळावी. आम्ही नियमात राहून आंदोलन करू.’

पाच हजारांची अट मान्य पण…

आझाद मैदानावर फक्त पाच हजार आंदोलकांनाच येता येईल, अशी अट पोलिसांकडून मनोज जरांगेंना घालण्यात आली आहे. याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, शासनाची पाच हजारांची अटही आम्हाला मान्य आहे. ते लोक पाच हजार म्हणतात, आम्ही चार हजार लोक आंदोलनाला बसू…इतर लोक दुसऱ्या मैदानात बसू, पण मी मागे हटत नाही.

मराठ्यांवर गोळ्या घालणार का?

‘मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन आहे. गरीब मराठ्यांचा अपमान करू नका. सत्ता मराठ्यांनी दिली; पण सरकार मराठ्यांवरच उलटले. रायगड आणि शिवनेरीसारखी प्रेरणास्थळे यश आणि प्रेरणा देतात,’ असे सांगत जरांगे यांनी सरकारला मराठाविरोधी भूमिका सोडण्याचे आवाहन केले.

आम्ही चर्चेला तयार आहोत, मागण्या मान्य केल्या तर इथेच आंदोलन थांबवतो, पण सरकारने आमच्या आंदोलनाला हात लावला तर मराठा समाज राज्यभर पेटून उठेल, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.

आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची आरक्षण यात्रा जुन्नरच्या जवळ असताना सतीश देशमुख या 45 वर्षीय आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने आरक्षण मोर्चावर शोककळा पसरली. देशमुख हे बीड जिह्याच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी होते. जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन देशमुख यांच्या भावाची भेट घेतली आणि तीव्र शोक व्यक्त केला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. आंदोलनावेळी कुठलीही गडबड होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी त्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक नियोजन केले आहे. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था व पार्किंग बाबतीतही पोलिसांनी आवश्यक नियोजन केले आहे.

आंदोलन लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये! -देवेंद्र फडणवीस

लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आणि आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही आंदोलनाला सामोरे जाऊ आणि त्यांच्याशी आवश्यक तेवढी चर्चा करू. लोकशाहीच्या चौकटीतच आम्ही उपाययोजना करू. मराठा आरक्षण आंदोलनाला उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे असे आंदोलन लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. नियम आणि निकषांचे पालन करून आंदोलन केले तर आमची ना नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले असून ते न्यायालयात टिकलेले आहे.

ओबीसी नेते उपोषण करणार

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. उद्यापासून राज्यात जनजागृती मोहीम राबवली जाईल. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल, असे तायवाडे यांनी सांगितले.

येणारे दिवस तुमचे राजकीय करीअर बरबाद करतील, फडणवीसांना इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला फसवलं आहे. दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. महायुतीचे सरकार मराठ्यांच्या मतांवरच आले आहे. देवेंद्र फडणवीस… तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली तर येणारे दिवस तुमचे राजकीय करीअर बरबाद करणारे असतील, असा थेट इशाराच मनोज जरांगे यांनी दिला.

किल्ले शिवनेरी येथे पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्या आणि समाजाच्या योगदानाचा आदर करायला हवा. फडणवीस मुंबईत कोणत्याही आंदोलकाला आझाद मैदानावर जाण्यापासून रोखणार नाहीत आणि गरीबांच्या वेदनेचा आदर करतील, अशी आम्हाला आशा आहे. आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देणे ही मराठा समाजाची चेष्टा आहे, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.

Comments are closed.