3 दहशतवादी बिहारमध्ये घुसले

पोलिसांनी घोषित केले 50 हजार रुपयांचे इनाम

वृत्तसंस्था/पाटणा

बिहार राज्याला लागून असलेल्या नेपाळ सीमेमधून किमान 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये पोलीसदल सावध झाले आहे. या दहशतवाद्यांचा ठावठिकाण्याची माहिती पोलिसांना देणाऱ्यास 50 हजार रुपयांची इनाम घोषित करण्यात आले आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या पासपोर्टची माहितीही प्रसिद्ध केली आहे. त्यांना पकडण्यासाठी राज्यभर अभियान चालविण्यात येत आहे. बिहारच्या उत्तरसीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस मुख्यालयांना या घुसखोरीची माहिती कळविण्यात आली असून या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी राज्यभर पोलिस पथके पाठविण्यात येत आहेत. नेपाळशी लागून असणाऱ्या सीमेवर गस्त वाढविण्यात आली असून राज्यभर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

छायाचित्रे प्रसारित

पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या पासपोर्टवर असलेल्या छायाचित्रांना प्रसारित केले आहे. त्यांची नावे हुसेन, आदील आणि उस्मान अशी असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहितीही गुप्तचरांनी दिली. त्यांनी गुरुवारी पहाटेच्या वेळेला नेपाळ सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. घुसखोरी झाल्याचे लक्षात येताच त्वरित पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्याचे अभियान हाती घेतले.

कोणत्या भागांमधील घुसखोर

ज्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ते पाकिस्ताच्या विविध भागांमध्ये वास्तव्य करणारे आहेत. हुसेन हा रावळपिंडीतील, आदिल हा उमरकोटमधील तर उस्मान हा बहावलपूर येथील असल्याची माहिती देण्यात आली. या तिघांनीही  नेपाळमधून प्रथम बिहारच्या अररिया जिल्ह्यात प्रवेश  आला. त्यानंतर ते वेगाने इतर जिल्ह्यांमध्ये पसरण्याच्या प्रयत्नात आहेत,  अशी माहितीही गुप्तचरांनी पुरविली. त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पाटणा पोलिसप्रमुखांनी व्यक्त केल्या आहे.  हे दहशतवादी काही आठवड्यांपूर्वीच पाकिस्तानातून नेपाळमध्ये आले आहेत.  ते शस्त्रसज्ज असल्याने त्यांचा धोका अधिक आहे,  असे पोलिसांनी स्पष्ट केले असून सर्वसामान्यांनही या दहशतवाद्यांना पडकण्यात साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

सीमेवर लक्ष

बिहार सीमेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या भागातून मोठ्या प्रमाणात घुसखोरीचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या वाढीव तुकड्या नियुक्त करण्यात आल्या असून सीमेवरील पहारा वाढविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता

येत्या दोन-सव्वादोन महिन्यांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय पक्षांनी त्यांचा प्रचाराचा प्रारंभही केला आहे. निवडणुकीत गोंधळ माजविण्यासाठी दहशवाद्यांनी हा कट केला असून तो हाणून पाडण्यासाठी पोलीस सज्ज  झाले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यांमध्ये बिहार विधानसमा निवडणुकीचे मतदान करण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातही सावधानता

बिहारमध्ये घुसलेले हे दहशतवादी भारतात इतरत्र पसरु शकतात. बिहारमध्ये दहशतवादी कृत्ये कारण्याचे त्यांचे  कारस्थान आहे. ते भारतभर पसरुन देशात अनेक स्थानी दहशतवादी हल्ले करु शकतात. त्dयामुळे देशातही सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला असून दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती बिहार पोलीसांच्या संवाद विभागाने दिली.

Comments are closed.