डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेत 'लक्ष्य' आहे
भारतावर 50 टक्के आयात शुल्काचा मुद्दा : चहुबाजूने होतेय अध्यक्षांवर टीका, चर्चेलाही स्थगिती
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
भारतावर भरभक्कम आयातशुल्क लादून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांनाच पणाला लावले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन कच्च्या तेलाची खरेदी करत युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक मदतीचा आरोप करत 50 टक्के आयातशुल्क लादले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भारतासोबत व्यापार करारावरून होत असलेल्या चर्चेच्या पुढील टप्प्यालाही स्थगित केले आहे. या धोरणांमुळे आता ट्रम्प यांना अमेरिकेतच विरोधाला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेतील राजकीय नेते आणि तज्ञांनी ट्रम्प यांचे आयातशुल्क धोरण आणि भारतावर लादण्यात आलेल्या शुल्कांप्रकरणी कठोर टीका केली आहे.
अमेरिकेने भारतावर लादलेले अतिरिक्त 50 टक्के शुल्क बुधवारपासून लागू झाल्यावर अमेरिकेच्या अनेक खासदार, राजनयिक आणि तज्ञांनी हे पाऊल अमेरिकेच्या सर्वात महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदारींपैकी एकाला नुकसान पोहोचवू शकतो असा इशारा दिला आहे. हाउस ऑफ फॉरेन अफेयर्स कमिटीच्या डेमोक्रेट्सनी अमेरिकेच्या या पावलामुळे चीनला लाभ होऊ शकतो असे म्हटले आहे. केवळ भारताला लक्ष्य करणे अजिबात योग्य नाही. शुल्कासोबत भारतावर लक्ष केंद्रीत करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकन नागरिकांना नुकसान पोहोचवत असून या प्रक्रियेत अमेरिका-भारत संबंध बिघडत असल्याचे समितीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक देशावर अतिरिक्त निर्बधांच्या धमकीचा पर्याय निवडला असता तर ठीक होते. परंतु केवळ भारतावर लक्ष केंद्रीत करण्याचा परिणाम बहुधा सर्वात भ्रामक धोरणात्मक निर्णय आहे. रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार चीन अद्याप सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करत असून त्याला आतापर्यंत अशी शिक्षा देण्यात आलेली नाही असे समितीने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
माजी उपाध्यक्षांनीही सुनावले
अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीही ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली. अमेरिकन कंपन्या आणि अमेरिकन ग्राहक अमेरिकन शुल्काची किंमत मोजत आहेत असे म्हणत पेन्स यांनी एक लेख शेअर केला आहे. यात कशाप्रकारे फोर्ड कंपनीने स्वत:ची बहुतांश वाहने अमेरिकेत तयार केली तरीही केवळ 3 महिन्यात कंपनीला 80 कोटी डॉलर्सचे शुल्क भरावे लागले हे नमूद आहे.
मोदींनी झुकू नये : माजी उपविदेशमंत्री
अमेरिकेचे माजी उपविदेशमंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी अमेरिका आणि भारताच्या भागीदारीला 21 व्या शतकात अमेरिकेचे सर्वात महत्त्वपूर्ण संबंध संबोधिले. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर झुकू नये असे कॅम्पबेल यांनी म्हटले आहे. अचानकपणे करण्यात आलेली शुल्काची घोषणा एक कूटनीतिक झटका असून यामुळे अमेरिकेलाच नुकसान होणार असल्याचा दावा अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत केनेथ जस्टर यांनी केला.
रिपब्लिकन पार्टीकडूनही लक्ष्य
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीच्या काही नेत्यांनीही ट्रम्प यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्यापारावरून भारतासोबतचे संबंध कमकुवत करणे एक रणनीतिक आपत्ती असेल, यामुळे चीनचा सामना करण्याची अमेरिकेची क्षमता कमकुवत होईल असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या निक्की हेली यांनी पेल. तर ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले जॉन बोल्टन यांनी आयातशुल्काला मोठी चूक संबोधून या निर्णयामुळे भारत चीन आणि रशियाच्या गोटात सामील होऊ शकतो असा इशारा दिला आहे.
Comments are closed.