भज्जीने मारली थप्पड, श्रीशांतच्या डोळ्यातून आले अश्रू… 17 वर्षांनी समोर आला व्हिडिओ!

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात ‘कॉन्ट्रोवर्सी’ म्हटली की हरभजन सिंह आणि श्रीशांत यांचा ‘थप्पड कांड’ आठवल्याशिवाय चर्चा पूर्णच होत नाही. हा प्रकार 2008 मध्ये, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात मोहाली येथे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यानंतर घडला होता. त्या वेळी मुंबईचा कर्णधार हरभजन होता. पंजाबने हा सामना तब्बल 66 धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर लगेचच मैदानावर श्रीशांत रडताना दिसला आणि नंतर कळले की हरभजनने त्याला थप्पड मारली आहे.

या घटनेचा व्हिडिओ मात्र कधीच सार्वजनिक झाला नव्हता. पण 17 वर्षांनंतर आता सोशल मीडियावर या थप्पड कांडाचा व्हिडिओ समोर आला असून चाहत्यांमध्ये आश्चर्याचे वातावरण आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की सामना संपल्यावर हातमिळवणुकीदरम्यान हरभजनने श्रीशांतला थप्पड मारली. सुरुवातीला श्रीशांतला काय घडले हे समजले नाही, पण नंतर तो संतापून भज्जीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र बाकी खेळाडूंनी दोघांनाही शांत केले.

या प्रकरणानंतर हरभजनवर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. याशिवाय 5 वनडे सामन्यांपासूनही त्याला दूर ठेवण्यात आले. हरभजनने अनेकदा या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. अगदी रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवरही त्याने कबूल केले की, “माझ्या आयुष्यात एक गोष्ट बदलता आली असती तर ती म्हणजे श्रीशांतसोबतची घटना. मी ती चूक केली नसती, ती माझ्या करिअरमधून पुसून टाकू इच्छितो. मी 200 वेळा माफी मागितली आहे. आजही प्रत्येक ठिकाणी माफी मागावी लागते.”

हरभजनला सर्वाधिक वेदना दिलेली गोष्ट म्हणजे श्रीशांतच्या मुलीची प्रतिक्रिया. भज्जीने सांगितले की, “तिने मला थेट सांगितले – ‘मी तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही माझ्या पप्पांना मारलं होतं.’ हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या नजरेत मी आजही वाईट माणूस आहे. मी ती प्रतिमा बदलण्याचा सतत प्रयत्न करतो आहे.”

Comments are closed.