आशिया कप 2025 पूर्वी टीम इंडियाला दिलासा, स्टार खेळाडू पुन्हा मैदानावर परतला!

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे आणि अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. मेगा इव्हेंटसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात बहुतांश नवीन आणि तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

आशिया कप सुरू होण्याआधी टीम इंडियाचा स्टार सलामीवीर आजारी पडला होता. त्यामुळे त्याने दुलीप ट्रॉफीतही भाग घेतला नव्हता. पण आता हा खेळाडू पुन्हा मैदानात परतला आहे, ही टीमसाठी मोठी खुशखबर आहे.

आशिया कप 2025 आधी शुबमन गिलची (Shubman gill) तब्येत बिघडली होती. त्याला दुलीप ट्रॉफीसाठी नॉर्थ झोनचा कर्णधार नेमलं होतं, पण आजारपणामुळे तो खेळू शकला नाही. मात्र आता शुबमन गिल फिट होऊन पुन्हा मैदानावर परतला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात तो बॅटिंग करताना दिसतो. आशिया कपसाठी त्याला भारताचा उपकर्णधारही बनवण्यात आलं आहे. त्यामुळे तो सलामीवीराची भूमिका बजावणार आहे.

गिलने भारतासाठी आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतक आहेत. भारतासाठी त्याने शेवटचा टी-20 सामना 30 जुलै 2024 ला श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. जवळजवळ वर्षभरानंतर तो पुन्हा टीममध्ये परतत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत गिलनं अप्रतिम फलंदाजी केली होती. संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करून त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याची टी-20 संघात पुनरागमन झालं. इंग्लंड दौऱ्यात त्याने 75.40 च्या सरासरीने 754 धावा ठोकल्या, त्यात 4 शतकांचा समावेश होता, ज्यात एक डबल सेंचुरीही होती.

Comments are closed.