IPL मधून अचानक निवृत्ती घेतलेल्या रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया, एम एस धोनीबद्दल केलं मोठं वक्तव्य!
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin retire from IPL) अचानक IPL मधून निवृत्ती जाहीर करून सगळ्यांना धक्का दिला. तब्बल 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्याने सोशल मीडियावरून IPL ला अलविदा केला. अश्विनने सांगितलं की, आता तो परदेशी लीगमध्ये खेळण्याचा विचार करत आहे. त्याने स्पष्ट केलं की IPL चे तीन महिने आता त्याच्यासाठी खूप थकवणारे ठरतात. यावेळी त्याने एम. एस. धोनीच्या (MS Dhoni) फिटनेस आणि समर्पणाची भरभरून प्रशंसा केली.
अश्विनच्या या निर्णयाने क्रिकेटविश्व आश्चर्यचकित झाले. त्याने सांगितलं की IPL चा दीर्घ आणि व्यस्त कार्यक्रम आता शारीरिक व मानसिकदृष्ट्या त्याच्यासाठी मोठं आव्हान बनला आहे. सलग तीन महिने प्रवास, सामने आणि त्यानंतर रिकव्हरी करणं आता पूर्वीइतकं सोपं राहिलेलं नाही.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला,
मी विचार केला की पुढचं IPL खेळावं का नाही? तीन महिन्यांची IPL स्पर्धा आता माझ्यासाठी थोडी जड वाटत आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर सलग तीन महिने खेळणं खूप थकवणारं झालं आहे. त्यामुळेच मी धोनीपासून खूप प्रेरित होतो. तोसुद्धा तीन महिनेच खेळतो, पण वय वाढत गेल्यावर हे तीन महिने खेळणं किती कठीण होतं, हे मला कळतं.
अश्विन पुढे म्हणाला, सलग तीन महिने प्रवास, सामने आणि पुन्हा रिकव्हरी हे सोपं नसतं. वय वाढल्यावर शरीराची रिकव्हरी क्षमता कमी होते, आणि जसं तुम्ही सावरता, तसचं पुन्हा खेळावं लागतं. यावर मी बराच विचार केला. आरोग्य हाही एक मोठा मुद्दा ठरला आहे.
अश्विनने यावेळी सांगितलं की त्याने एका परदेशी लीगसाठी नोंदणी केली आहे, मात्र कोणत्या स्पर्धेसाठी हे उघड केलेलं नाही. तो म्हणाला, जर तुम्ही विदेशात जाऊन खेळलात तर तो वेगळाच अनुभव असतो. मजाही येते. तिथं लोक रस्त्यावर सहज ओळखत नाहीत, त्यामुळे तुम्ही निवांत एन्जॉय करू शकता.
अश्विनने आणखी स्पष्ट केलं, असं नाही की मी जगभर फिरून प्रत्येक लीग खेळेन. नाही, मी वर्षभरात 10 महिने क्रिकेट खेळू शकत नाही. मी योग्य संधीची वाट पाहीन आणि विविध संघांच्या योजनांमध्ये मी कुठे बसतो ते पाहीन. मी आधीच एका लीगसाठी नोंदणी केली आहे. आता पुढे काय होतं ते बघू.
Comments are closed.