वाढीचा दर वाढतो

पहिल्या तिमाहीत गाठला 7.8 टक्क्याचा आकडा, अर्थव्यवस्था स्थिर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिकेच्या 50 टक्के व्यापार शुल्काची टांगती तलवार असतानाही भारताच्या विकासदराने आर्थिक वर्ष 2025-2026 च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत 7.8 टक्क्याची पातळी गाठली आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी घोषित केली आहे. हा विकासदर अपेक्षेपेक्षा पुष्कळ अधिक आहे. विकासदराचे अनुमान 7 टक्क्यांचे होते. तथापि, त्यापेक्षा अधिक अंतर गाठण्यात आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत विकासाचा दर 6.5 टक्के होता. त्या तुलनेत यंदाचा विकासदर 1.3 टक्क्याने अधिक आहे. भारताची अर्थव्यवस्था आता चांगलीच स्थिरावली असून ती पुढच्या काळात वेगाने विस्तारणार आहे, असा या आकडेवारीचा अर्थ काढला जात आहे. उद्योग जगतानेही या आकडेवारीवर समाधान व्यक्त केले असून ती उत्साहवर्धक असल्याचे स्पष्ट केले आहे. या समाधानकारक विकास दरात सेवा क्षेत्राचे योगदान लक्षणीय आहे.

78.25 लाख कोटींची उलाढाल

नव्या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत एकंदर उलाढाल 78 लाख 25 हजार कोटी रुपयांची झाली आहे. ही ‘नॉमिनल’ उलाढाल आहे. ‘रियल’ विकासदराशी जोडलेली उलाढाल स्थिर किमतीच्या आधारावर 44 लाख 64 हजार कोटी रुपये इतकी आहे. या रियल उलाढालीत वस्तू कर आणि अनुदानांचा समावेश नसल्याने ती कमी वाटते. नॉमिनल उलाढाल ही मोठी आहे. मागच्या वर्षीच्या प्रथम तिमाहीत रियल उलाढाल 71 लाख 95 हजार कोटी रुपयांची होती. अशाप्रकारे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत उलाढाल 8.8 टक्क्यांनी वाढली आहे.

कृषी क्षेत्राचा वेगवान विकास

नवीन आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत कृषी क्षेत्राची कामगिरी स्पृहणीय झाली आहे. या क्षेत्राने 3.7 टक्क्यांचा विकास दर गाठला असून गेल्या वर्षीच्या प्रथम तिमाहीच्या तुलनेत त्यात तब्बल 2.2 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. वस्तू उत्पादन क्षेत्राचा विकासदर 7.7 टक्के असून तो गेल्यावर्षीच्या प्रथम तिमाहीच्या तुलनेत 0.5 टक्क्यांनी वाढला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास 7.6 टक्के असून त्यातही गेल्यावेळच्या तुलनेत वाढ झाली आहे. तथापि, खाणउद्योग मात्र 3.1 टक्के आकुंचित झाला आहे. तर वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर युटिलिटी क्षेत्रांचा विकासदर केवळ 0.5 टक्क्यांनी वाढला आहे, असे दिसून येत आहे.

खर्चाची बाजूही भक्कम

प्रथम तिमाहीत खर्चाच्या बाजूतही मोठी प्रगती झाली आहे. एस्क्पेंडिचर (जीएफसीई) निर्देशांक 9.7 टक्के असून तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत केवळ 4 टक्के होता. त्यात दुपटीपेक्षाही अधिक झालेली वाढ समाधानकारक मानण्यात येत आहे. या क्षेत्रात वाढ होणे, अर्थव्यवस्थेच्या भक्कमपणाचे लक्षण मानले जाते. गृहोपयोगी खर्चातही वाढ झाली असून ती 7 टक्के आहे, असे दिसून येते.

सेवाक्षेत्राचे विक्रमी योगदान

प्रथम तिमाहीतील विकासदराने 7.8 टक्क्यांचा पल्ला गाठण्यात सेवा क्षेत्राचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. या क्षेत्राचा याच कालावधीतील विकास दर 9.3 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या काळात तो अवघा 6.8 टक्के होता. सेवाक्षेत्राचा हा विकासदर अपेक्षेपेक्षा पुष्कळ मोठा असल्याची माहिती दिली गेली.

गुंतवणुकीत मोठी वाढ

या तिमाहीतील गुंतवणूक निर्देशांकातही मोठी, अर्थात 7.8 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ती गेल्या वर्षीच्या प्रथम तिमाहीत 6.7 टक्के होती. याचाच अर्थ असा की भारताच्या अर्थव्यवस्थेत नवे भांडवल मोठ्या प्रमाणात येत आहे. आव्हानात्मक परिस्थिती पाहता हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिक्रिया आहे.

आव्हानात्मक परिस्थितीतही…

ड व्यापार शुल्काच्या आव्हानात्मक परिस्थितीतही विकासदराची मोठी झेप

ड सेवा क्षेत्राचा विकासदर अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक, योगदान महत्त्वाचे

ड कृषी आणि बांधकाम क्षेत्रांच्या विकासदरात मोठ्या प्रमाणात उलाढाल

ड गुंतवणुकीच्या क्षेत्रातही मोठी प्रगती, गेल्या वर्षीपेक्षा दरात पुष्कळ वाढ

Comments are closed.