पीएसीएलचे संचालक गुरजांत सिंग यांना अटक केली
वृत्तसंस्था/ मोहाली
आर्थिक गुन्हे अन्वेषण संघटनेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने पीएसीएल कंपनीचे संचालक गुरजंत सिंग गिल यांना पंजाबमधील मोहाली येथून अटक केली आहे. पीएसीएल म्हणजेच पीअरलेस अॅग्रो अँड रिअल इस्टेट कंपनी लिमिटेडवर कोट्यावधी गुंतवणूकदारांना जमीन आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप आहे. गुरजंत सिंग गिल यांच्यावर गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हा घोटाळा सुमारे 49 हजार कोटी रुपयांचा असून तो आतापर्यंत भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये गणला जातो. देशातील सर्वात मोठ्या चिटफंड घोटाळ्यांपैकी एक असलेल्या पीएसीएल घोटाळ्यातील ही कारवाई फार महत्त्वाची मानली जात आहे.
पीएसीएल कंपनीने लहान शहरे आणि गावांमधील एजंट्सद्वारे गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करताना रिअल इस्टेटमध्ये जास्त परतावा मिळेल, असा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात कंपनीने ही रक्कम कुठेही गुंतवली नाही आणि हळूहळू हजारो कोटी रुपये हडप केल्याचे निदर्शनास आले आहे. तपास यंत्रणांच्या मते, पीएसीएलने देशभरातील सुमारे 5 कोटी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम सुमारे 49 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. हा घोटाळा इतका मोठा होता की सेबी आणि सर्वोच्च न्यायालयालाही त्यात हस्तक्षेप करावा लागला. गुंतवणूकदारांना अद्याप त्यांचे कष्टाचे पैसे परत मिळू शकलेले नाहीत.
Comments are closed.