मोदींच्या दौऱ्यांवर टॅरिफचे सावट; जपानी उद्योजकांना साद, चीनशी मैत्रीचा आशावाद

अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफचे सावट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान व चीन दौऱयावर आहे. दोन दिवसांच्या जपान दौऱयावर असलेल्या मोदींनी आज तेथील उद्योजकांना हिंदुस्थानात येऊन उत्पादन करण्याचे आवाहन केले, तर चीनशी सौहार्दपूर्ण संबंधांचा आशावादही जागवला.

टोकियो येथील इंडो-जपान इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना ते बोलत होते. जपानकडे टेक्नोलॉजी आहे, तर हिंदुस्थानकडे टॅलेंट आहे. या बळावर आपण जगाला नेतृत्व देऊ शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांना जपानमधील एका मंदिरात पारंपरिक दारुमा बाहुली भेट देण्यात आली. जपानी संस्कृतीत ही बाहुली शुभ मानली जाते.

टॅरिफची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

‘जपान न्यूज’शी बोलताना मोदींनी चीन दौऱयावरही भाष्य केले. हिंदुस्थान आणि चीन हे जगातील दोन मोठे देश आहेत. या दोन्ही देशांतील शांततापूर्ण आणि स्थिर संबंध हे आशिया व जागतिक शांतता व समृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. चीनसोबत द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यास हिंदुस्थान सकारात्मक आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदींची ही सकारात्मक भूमिका टॅरिफची तीव्रता कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानली जात आहे.

Comments are closed.