आरसीबीची मोठी घोषणा! चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या चाहत्यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत
4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयानंतर काढण्यात आलेल्या विजय जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बराच काळ शांत राहिल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझीनं शनिवारी आपल्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. ‘RCB CARES’ या उपक्रमातून पीडितांच्या कुटुंबांना मदत व सन्मान दिला जाणार आहे.
आरसीबीनं सोशल मीडियावर भावना व्यक्त करत म्हटलं आहे : “4 जून 2025 रोजी आमची हृदये तुटली. आम्ही आमच्या आरसीबी कुटुंबातील 11 सदस्य गमावले. ते आमचेच एक भाग होते. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव नेहमी राहील. कोणतीही मदत त्यांच्या जागी येऊ शकत नाही. पण पहिल्या टप्प्यात, आणि पूर्ण आदराने, आरसीबीने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत केली आहे. ही फक्त आर्थिक मदत नाही, तर करुणा, एकता आणि सातत्यपूर्ण काळजीचं आश्वासन आहे. ‘RCB CARES’ हा त्याच प्रवासाचा पहिला टप्पा आहे. त्यांच्या स्मृतींना जपण्यासाठी आणि दीर्घकालीन कृतीसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पुढचं प्रत्येक पाऊल चाहत्यांच्या भावना आणि अपेक्षा यांवर आधारित असेल.”
आरसीबीने 25 लाख आर्थिक मदतीची घोषणा केली. pic.twitter.com/mknjmnqhlr
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 30 ऑगस्ट, 2025
RCB CARES म्हणजे काय?
या उपक्रमाअंतर्गत पीडित कुटुंबांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर भविष्यातील समुदायाभिमुख व चाहत्यानुरूप कार्यक्रम राबवले जातील.
आरसीबीच्या या विजय जल्लोषातील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 75 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर आयसीसीनं महिला एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यांचे बेंगळुरूतील सामने मुंबईला हलवले. तर केएससीएला (Karnataka State Cricket Association) महाराजा टी20 ट्रॉफीची सामने मैसूरला हलवावे लागले.
या उपक्रमाद्वारे आरसीबीनं मृत्युमुखी पडलेल्या चाहत्यांना “आरसीबी कुटुंबाचा कायमस्वरूपी भाग” घोषित करत त्यांच्या स्मृतींना मान दिला आहे. दुःखातून सकारात्मक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आरसीबीने आपल्या चाहत्यांना आश्वस्त केलं की त्यांच्या भावना आणि आवाज हाच पुढच्या प्रवासाचा मार्गदर्शक असेल.
Comments are closed.