मुलींना लवकर पाळी येते? जाणून घ्या कारणं व परिणाम

आजकाल अनेक पालकांना एक गोष्ट जाणवते मुलींना पूर्वीपेक्षा खूप लवकर पाळी येऊ लागली आहे. ज्या वयात पूर्वी मुलींना 14-15 व्या वर्षी पाळी सुरू होत असे, त्या वयाऐवजी आता 8-9 वर्षांच्या मुलींनाही पाळी सुरू होताना दिसते. काही वेळा तर ही प्रक्रिया अजून लहान वयात सुरू होते. ही चिंता वाढवणारी बाब आहे आणि यामागील कारणं तसेच परिणाम समजून घेणं आवश्यक आहे. (early periods girls causes effects care)

लवकर पाळी येण्याची कारणं

1) अयोग्य आहार आणि जंक फूड: बाहेरचं, पॅकेज्ड आणि जास्त फॅट-शुगर असलेलं खाणं मुलींच्या हार्मोन्सवर परिणाम करतं.

2) प्लास्टिक आणि केमिकल्सचा संपर्क: प्लास्टिकमध्ये साठवलेलं अन्न, कॉस्मेटिक्स किंवा कीटकनाशकं यातील रसायनं शरीरात इस्ट्रोजेनसारखं वागतात आणि पाळी लवकर येण्यास कारणीभूत ठरतात.

3) बसून राहण्याची सवय (Sedentary lifestyle): शारीरिक हालचाल कमी झाल्याने शरीरात चरबी साठते. यामुळे हार्मोनल असंतुलन वाढतं.

4) जास्त स्क्रीन टाइम व झोपेचा अभाव: मोबाईल, टीव्ही, गेमिंग यामुळे उशिरापर्यंत जागरण होतं, पुरेशी झोप मिळत नाही. यामुळेही हार्मोन्स बिघडतात.

5) ताणतणाव (Stress): शिक्षण, स्पर्धा किंवा इतर कारणांमुळे होणारा मानसिक ताणसुद्धा या प्रक्रियेला गती देतो.

लवकर पाळी येण्याचे परिणाम

शारीरिक बदल:

लवकर हार्मोनल बदल झाल्यामुळे मुलींचं उंचीचं वाढणं थांबतं. लवकर वाढलेली उंची पुढे स्थिरावते आणि प्रौढ वयात उंची कमी राहते.

आरोग्याशी संबंधित धोके:

लवकर पाळी सुरू झालेल्या मुलींमध्ये PCOS, लठ्ठपणा, टाईप २ डायबेटीस यांचा धोका वाढतो. दीर्घकाळ इस्ट्रोजेनचा प्रभाव राहिल्याने ब्रेस्ट कॅन्सर, युटेरिन कॅन्सरचा धोका जास्त असतो.

भावनिक परिणाम:

लहान वयात शरीरात होणारे बदल मुलींना मानसिकदृष्ट्या त्रास देतात. त्या आपल्या मैत्रिणींपेक्षा वेगळ्या असल्याचं जाणवल्याने लाज, अस्वस्थता, नैराश्य आणि ताण वाढतो.

पालकांनी घ्यायची काळजी

1) खेळ व व्यायाम प्रोत्साहित करा: मुलींनी दररोज किमान 1 तास तरी शारीरिक हालचाल, खेळ करणं आवश्यक आहे.

2) संतुलित आहार द्या: घरचं ताजं, पौष्टिक अन्न द्या. जंक फूड, पॅकेज्ड पदार्थ कमी करा.

3) प्लास्टिक टाळा: अन्न साठवण्यासाठी स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करा.

4) स्क्रीन टाइम कमी करा: मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा वापर नियंत्रित करा.

5) पुरेशी झोप मिळावी: मुलींना रोज 7-8 तास शांत झोप मिळणं आवश्यक आहे.

6) डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर पाळी 8-9 व्या वर्षीच सुरू झाली असेल तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन कारण समजून घ्यावं.

लहान वयातच पाळी येणं हे फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्याही गंभीर आहे. पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता मुलींच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणे, संतुलित आहार देणे आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनशैलीच या समस्येवर उपाय ठरू शकते.

Comments are closed.