बळीराजा कोलमडला; अतिवृष्टीचा 29 जिल्ह्यांतील शेतीला फटका, तब्बल 14 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्र बाधित
गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका तब्बल 29 जिह्यांतील 191 तालुक्यांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले असून राज्यात एकूण 14 लाख 44 हजार 749 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.
राज्यातील 12 जिह्यांत 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक बाधित जिह्यांमध्ये नांदेड 6 लाख 20 हजार 566 हेक्टर, वाशीम 1 लाख 64 हजार 557 हेक्टर, यवतमाळ 1 लाख 64 हजार 932 हेक्टर, धाराशीव 1 लाख 50 हजार 753 हेक्टर, बुलढाणा 89 हजार 782 हेक्टर, अकोला 43 हजार 828 हेक्टर, सोलापूर 47 हजार 266 हेक्टर आणि हिंगोली 40 हजार हेक्टर या जिह्यांचा समावेश आहे.
अतिवृष्टीने बाधित जिल्हे
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशीव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड आणि नागपूर.
बाधित पिके
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बाधित भागातील सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Comments are closed.