टोकियोत रंगणार भालाफेकीतली ’कट्टर’ हाणामारी, वर्षभरानंतर नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम पुन्हा आमने सामने

सीमारेषेवर कट्टर शत्रू मानले जाणारे हिंदुस्थान आणि पाकिस्तान आता पुन्हा एकदा खेळाच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस टोकियो येथे होणाया जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम भालाफेकच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे स्पर्धेला ‘हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान’ या परंपरागत वैराचा रंग चढणार आहे.
पॅरिस 2024 ऑलिंपिकनंतर दुखापतीमुळे बाहेर गेलेला नदीम आता पुन्हा सज्ज झाला आहे. त्याचे वैद्यकीय सल्लागार असद अब्बास यांनी सांगितले की, “नदीम आता पूर्णपणे फिट असून नीरजसह जगातील नामांकित खेळाडूंशी सामना करण्यास तयार आहे.’’
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान टोकियो येथे रंगणार असून पुरुषांच्या भालाफेक पात्रता फेरी 17 सप्टेंबरला आणि अंतिम लढत 18 सप्टेंबरला होणार आहे. जपान नॅशनल स्टेडियमवर रंगणाया या संघर्षाकडे संपूर्ण क्रीडाजगताचे लक्ष लागले आहे.
पॅरिस 2024 नंतर हा नीरज विरुद्ध नदीमचा पहिला थरारक सामना असेल. नदीमने त्यानंतर फक्त एकच स्पर्धा खेळली होती. मे महिन्यात कोरिया प्रजासत्ताकातील गुमी येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने 86.40 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले होते. दुसरीकडे, गेल्या महिन्यात डायमंड लीग जिंकणारा जर्मनीचा ज्युलियन वेबर, दोन वेळा विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स आणि त्रिनिदाद-टोबॅगोचा माजी ऑलिंपिक विजेता केशॉर्न वॉलकॉट या दिग्गजांचाही सहभाग अपेक्षित आहे.
या सगळ्यामुळे टोकियोतील पुरुषांच्या भालाफेक फेरीत नीरजपुढे केवळ वैयक्तिक नाही, तर हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या अभिमानाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मैदानावरचा हा ‘भालाफेकीचा भारत-पाक सामना’ जागतिक रंगमंचावर विशेष ठरणार, यात शंका नाही.
Comments are closed.