Kadyavarcha Ganpati : कोकणातल्या गावात अवतरलेला बाप्पा, इथे ठेवलं पहिलं पाऊल
कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर आपसूकच निसर्गाचे सुंदर चित्र उभे राहते. या भागातील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावात वसलेला ‘कड्यावरचा गणपती’. हे एक जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी स्वतः बाप्पा अवतरला होता. त्यामुळे इथे श्रीगणेशाने पृथ्वीवर ठेवलेल्या पहिल्या पावलाची खूण अद्याप आहे. चला तर जाणून घेऊया ‘कड्यावरचा गणपती’ मंदिराचा इतिहास आणि वैशिट्ये. (kadyavarcha ganpati aanjarle dapoli temple history)
कुठे आहे?
दापोलीपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आंजर्ले गाव आहे. जोग नदीच्या मुखाशी वसलेले हे गणेश मंदिर सुवर्ण दुर्ग किल्ल्याजवळील आंजर्ले बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे. संकष्टी, अंगारकी, गणेश जयंती आणि गणेशोत्सवात या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.
स्थापना आणि बांधकाम
‘कड्यावरचा गणपती’ या मंदिराची स्थापना सुमारे 600 वर्षांपूर्वी झाल्याचे दाखले दिले जातात. त्यानुसार इ.स. 1430 च्या सुमारास हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. मंदिर स्थापनेविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. मात्र, ते निश्चित करणारे मूळ पुरावे नाहीत. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे. जी साधारण 3.5 ते 4 फुट उंचीची आहे. ही मूर्ती एक प्रतिसाद देणारी देवता असल्याचे मानले जाते. जी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. गणेशमूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीदेखील आहेत.
माहितीनुसार, सुरुवातीला या मंदिराचे बांधकाम लाकडी स्वरूपाचे होते. मात्र, इ.स.1789 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नवे मंदिर उभारण्यात आले. त्यावेळी काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे पांढरे शुभ्र मंदिर उभारले गेले. साधारणपणे 65 फूट उंच असलेले हे देवालय 40 ते 50 फूट क्षेत्रफळाचे आहे. मंदिराचा एकूणच परिसर अत्यंत विस्तीर्ण असून मध्यभागी श्री गणपती तर शेजारी शिव शंकराचे मंदिर स्थित आहे.
श्रीगणेशाचे पहिले पाऊल
स्थानिक आख्यायिकेनुसार, हे मंदिर मूळतः समुद्रकिनाऱ्यावर होते. मात्र, आता ते कड्यावर वसलेले आहे. त्यामागील कारण असे की, समुद्राची पातळी अचानक वाढल्यामुळे हे मंदिर पाण्यामध्ये गेले होते. त्यामुळे समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नव्या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यानुसार एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर श्रीगणेशाचे नवे मंदिर बांधले गेले. जिथे चढ- उतारासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या.
विशेष म्हणजे या नव्या मंदिराच्या स्थापनेवेळी साक्षात श्रीगणेश पृथ्वीवर अवतरले होते. या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा श्रीगणेश स्वतः आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या डोंगराच्या माथ्यावर पडले आणि दुसरे थेट मंदिरात. ज्या ठिकाणी त्यांचे पहिले पाऊल पडले तिथे खूण उमटली आणि आज या ठिकाणाला ‘श्री गणपतीचे पाऊल’ म्हणून ओळखले जाते.
कसे जाल?
‘कड्यावरचा गणपती’ मंदिरात जाण्यासाठी वाहतुकीच्या विविध सोयी उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे, एमएसआरटीसी बस, लोकल वाहने किंवा खाजगी गाड्यांच्या माध्यमातून या मंदिरापर्यंत जाणे शक्य आहे. मंदिरापासून सुमारे ५३ किमी अंतरावर असलेले खेड हे सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक आहे. शिवाय दापोली, चिपळूण, मुंबई, पुणे, सातारा, रायगड आणि महाबळेश्वरमधून आंजर्ले गावात जाण्यासाठी उत्तम बस सुविधा आहेत. आंजर्ले गावातून लोकल रिक्षा किंवा अन्य वाहने करूनही मंदिरापर्यंत जाता येईल.
हेही वाचा –
Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम
Comments are closed.