धोनीविषयीचं विधान ठरलं वादग्रस्त, इरफान पठाणच्या आरोपांवर ‘या’ दिग्गजाचं प्रत्युत्तर!
माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण यांचा (Former Indian cricketer Irfan Pathan) एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ते माजी कर्णधार एम. एस. धोनी (MS Dhoni) याच्यावर मोठा आरोप करताना दिसतात. व्हिडिओमध्ये इरफान म्हणतात की, धोनी अशा खेळाडूंनाच संघात घेत असे, जे त्याच्या खोलीत ‘हुक्का’ लावून द्यायचे. आता इरफानच्या या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू व लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रा यांनी इरफानवर पलटवार करत धोनीचं समर्थन केलं आहे.
आकाश चोप्रा यांनी इरफान पठाणचे आरोप थेट फेटाळले. ते म्हणाले की, कर्णधार नेहमी सर्वोत्तम संघच निवडतो. त्याचा उद्देश केवळ जिंकणारा संघ निवडण्याचा असतो. कर्णधाराच्या खोलीत काय होतं, कोण काय करतं, याचा त्याच्या निवडीवर काही परिणाम होत नाही. त्याला फक्त जिंकता येईल असा संघ हवा असतो.
आकाश पुढे म्हणाले की, जर कर्णधाराला वाटलं की एखादा खेळाडू दडपणाखाली नीट खेळत नाही, तर त्याला निवडलं जात नाही. जो दडपणाखाली उत्तम खेळतो, त्यालाच संधी मिळते. त्यांनी अजून स्पष्ट केलं की “हे काही नवीन नाही की कर्णधार किंवा प्रशिक्षकाच्या भागातील खेळाडूंना जास्त संधी मिळतात. कारण त्यांनी त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवला असतो. याला पक्षपात म्हणता येत नाही.
इरफान पठाण यांनी स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 2008 च्या ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान धोनीचं एक वक्तव्य आलं होतं. त्यात त्याने म्हटलं होतं की इरफान पठाण नीट गोलंदाजी करत नाही. त्यानंतर इरफान स्वतः धोनीकडे गेले आणि विचारलं. त्यावर धोनी म्हणाला की, असं काही नाही, सगळं प्लॅनप्रमाणेच चाललं आहे.
संघातून बाहेर टाकण्यात आल्यानंतर इरफान पठाण म्हणाले, मला कुणाच्या खोलीत हुक्का लावायची ना सवय आहे, ना इच्छा आहे. याबद्दल बोलण्याचीही गरज नाही. हे सगळ्यांना माहीत आहे, पण कधी कधी न बोलणंच बरं असतं. प्रत्येक खेळाडूचं खरं काम मैदानात चांगली कामगिरी करणं असतं आणि मी फक्त त्यावरच लक्ष दिलं.
Comments are closed.