खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये 'स्वदेशी' मोर्चा ठेवावा!
रालोआच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदींचे आवाहन : जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये जनजागृतीचेही निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांना देशभरात ‘स्वदेशी’ मेळावे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. अशा मेळाव्यांच्या माध्यमातून मेड-इन-इंंडिया उत्पादनांना चालना मिळेल आणि लोकांना आत्मनिर्भर भारत अभियानाशी जोडले जाऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच खासदारांनी आपल्या मतदारसंघातील व्यापाऱ्यांना भेटून जीएसटी दर कमी केल्याच्या सरकारच्या पुढाकाराचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवून जगजागृती करावी, असेही मोदी म्हणाले.
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी सोमवारी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रालोआच्या कार्यशाळेत आणि संसदीय पक्षांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. सोमवार हा भाजप खासदारांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा शेवटचा दिवस होता. या बैठकीला एनडीए पक्षांचे खासदार देखील कार्यशाळेत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समारोप सत्रात भाषण करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘व्होकल फॉर लोकल’ ही केवळ एक घोषणा नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि रोजगार निर्मितीचा एक मजबूत पाया आहे. ‘स्वदेशी मेळावा’ लहान कारागीर, हस्तकलाकार आणि स्थानिक उद्योगांना एक नवीन व्यासपीठ प्रदान करेल, असे पंतप्रधानांनी खासदारांसमोर स्पष्ट केले.
जीएसटी दरकपात ही मोठी उपलब्धी
मोदींनी खासदारांना सांगितले की, सरकारने अलिकडेच केलेल्या जीएसटी दर कपातीमुळे बाजारात सकारात्मक लाट निर्माण झाली आहे. हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे ही खासदारांची जबाबदारी आहे. या पावलाचे फायदे व्यापाऱ्यांसोबत बैठका घेऊन समजावून सांगावेत आणि लोकांना खात्री द्यावी की सरकार त्यांच्यासोबत आहे, असेही मोदी म्हणाले.
स्वावलंबी भारताशी जोडलेला संदेश
‘स्वावलंबी भारत’ ही केवळ स्वावलंबीतेची कल्पना नाही तर देशाच्या भविष्याची सुरक्षितता आहे. जेव्हा भारतीय उत्पादनांचा वापर वाढेल तेव्हा केवळ रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच असे नाही तर परकीय आयातीवरील अवलंबित्व देखील कमी होईल. कोणीही गुंतवणूक केली तरी उत्पादन भारतीय असले पाहिजे आणि हाच ‘स्वदेशी मंत्र’ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
28 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘व्होकल फॉर लोकल’ वर भर दिला होता. त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना शक्य तितक्या ‘मेड-इन-इंडिया’ उत्पादने खरेदी करावीत आणि दुकानदारांनी ‘उपलब्ध स्वदेशी वस्तू’ असे फलक लावावेत, असे निर्देश दिले होते. त्या बैठकीत पंतप्रधानांनी भारत कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास तयार असून त्यासाठी स्वावलंबन हे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे नमूद केले होते.
Comments are closed.