मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची तयारी
भारताने बेल्जियसमोर मांडला तुरुंगविषयक तपशील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय यंत्रणांनी पूर्ण जोर लावला आहे. मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती. परंतु चोक्सी हा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड देत असल्याने त्याला अन्य कैद्यांप्रमाणे कोठडीत ठेवले जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला आहे. यावर भारताने बेल्जियमला काही आश्वासने दिली आहेत. चोक्सीला आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाईल, जेथे त्याला आवश्यक भोजनासह वैद्यकीय देखभालीची सुविधाही देण्यात येणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.
तुरुंगात स्वच्छता आणि सफाईची पूर्ण काळजी घेण्यात येईल असे भारताकडून सांगण्यात आले आहे. बेल्जियमच्या प्रशासनाला गृह मंत्रालयाकडून पत्र लिहिण्यात आले आहे. यात भारतात चोक्सीसाटी तयार करण्यात आलेल्या तुरुंग कोठडीत कोणती व्यवस्था असेल हे सांगण्यात आले आहे. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाच्या बॅरक क्रमांक 12 मध्ये चोक्सीला ठेवण्यात येणार असल्याचे भारताने बेल्जियमला कळविले आहे.
तुरुंगात मिळणार सुविधा
तुरुंगाच्या या कोठडीत एक गादी, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट दिले जाते, याचबरोबर धातूची फ्रेम असलेला लाकडी बेडही देण्यात येणार आहे. आरोग्य विचारात घेत पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन आणि स्टोरेजची सुविधाही देण्यात येणार आहे. याचबरोबर चोक्सीला तुरुंगात स्वच्छ पेयजल आणि पूर्णवेळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल. तसेच बाहेर हिंडणे आणि व्यायाम करण्यासाठी दररोज एक तासासाठी कोठडीतून बाहेर पडण्याची अनुमती दिली जाणार आहे. चोक्सीला तुरुंगात तीनवेळा भोजन मिळणार आहे. तसेच वैद्यकीय कारणामुळे खास आहाराची गरज भासल्यास तेही पुरविण्यात येणार आहे. तुरुंगात एक कँटीन असून तेथून फळे आणि खाद्यपदार्थ खरेदी केले जाऊ शकतात. याचबरोबर योग, ध्यानधारणा, वाचनालय आणि बोर्ड गेम्स यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. चोक्सीला बॅडमिंटन खेळण्याचीही संधी मिळणर आहे.
चालू महिन्यात सुनावणी
चोक्सीने 22 ऑगस्ट रोजी आणखी एक जामीन याचिका दाखल करत घरातच नजरकैद राहण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु न्यायालयाने ही याचिका देखील फेटाळली होती. गीतांजली समुहाचा मालक असलेला 66 वर्षीय चोक्सीच्या प्रत्यार्पणप्रकरणी चालू महिन्यातच बेल्जियमच्या एका न्यायालयात दावे-प्रतिदावे होणार आहेत.
बॅरक क्रमांक 12
बॅरक क्रमांक 12 ला मुख्य तुरुंग परिसरापासून वेगळे ठेवण्यात आले आहे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून तेथे सातत्याने नजर ठेवली जाते. तसेच तेथे तुरुंग कर्मचारी तैनात असतात, या हिस्स्यात वकिलांसोबत दैनंदिन बैठका (रविवार आणि सार्वजनिक सुटी वगळता), कुटुंबीयांसोबत साप्ताहिक भेट, टेलिफोन तसेच व्हिडिओ-कॉन्फरसिंग सुविधा उपलब्ध असते.
न्यायालयाने फेटाळली याचिका
बेल्जियमच्या एका न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात मेहुल चोक्सीच्या जामीन याचिकेला फेटाळले होते. न्यायालयाने सीबीआयकडून बेल्जियमच्या सरकारी पक्षाला दिलेल्या ठोस पुराव्यांमुळेच त्याची याचिका फेटाळली गेली होती. चोक्सी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी यापूर्वीच अनेक न्यायालयांच्या न्यायाधिकार क्षेत्रातून पसार झाला आहे आणि त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्यास तो अन्य देशात पळू शकतो असे सीबीआयने बेल्जियम प्रशासनासमोर स्पष्ट केले होते. सीबीआयकडून पाठविण्यात आलेल्या प्रत्यार्पण विनंतीच्या आधारावर चोक्सीला एप्रिल महिन्यात बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती.
Comments are closed.