हिमाचल प्रदेशने पूर्णपणे साक्षर राज्य घोषित केले

राज्याचा साक्षरता दर 99.30 टक्क्यांवर पोहोचल्याचे स्पष्ट

वृत्तसंस्था/ शिमला

शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत हिमाचल प्रदेशने सोमवारी पूर्ण साक्षर राज्यांच्या यादीत आपले नाव नोंदवण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त शिमला येथे आयोजित ‘पूर्ण साक्षर हिमाचल समारोह आणि उल्लास मेळा-2025’ प्रसंगी मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंग सुक्खू यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशला ‘पूर्ण साक्षर राज्य’ म्हणून घोषित केले. राज्याने निर्धारित वेळेपूर्वी हे यश मिळवण्याची क्रांती केली आहे. राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे हिमाचलमधील साक्षरता 99.30 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून ती राष्ट्रीय मानक 95 टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे.

शालेय शिक्षण संचालनालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिमाचल प्रदेशल पूर्ण साक्षर राज्य जाहीर करण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. निरक्षर ते पूर्ण साक्षर हा प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. दर्जेदार शिक्षण देण्याच्या ध्येयाने हिमाचल प्रदेश सतत पुढे जात आहे. काळाबरोबर शिक्षणाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी, आधुनिक युगानुसार शिक्षण व्यवस्थेत बदल करणे आवश्यक आहे. जर हिमाचलला पूर्णपणे साक्षर राज्य तसेच प्रत्येक स्तरावर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठेवायचे असेल, तर या क्षेत्रात सतत सुधारणा कराव्या लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Comments are closed.