उपराष्ट्रपतीपासून बीआरएस-बीजेडी अंतर
दोन्ही पक्ष मतदानात सहभागी होणार नाहीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींचे नाव मंगळवारी जाहीर होणार आहे. यावेळी उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. या उपराष्ट्रपती निवडणुकीतून दूर राहण्याची घोषणा दोन राजकीय पक्षांनी केली आहे. या पक्षांमध्ये बीआरएस आणि बिजू जनता दलाचा समावेश आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी बीआरएस आणि बिजू जनता दलाने धक्कादायक घोषणा केली आहे. आपला पक्ष उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहील, असे बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे, बीजेडीनेही अशीच घोषणा केली आहे. मंगळवारी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीत बिजू जनता दलाचा सहभाग राहणार नाही, असे बीजेडी नेते सस्मित पात्रा यांनी सांगितले. बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या सूचनेनुसार पक्षाचे खासदार उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी, राजकीय व्यवहार समिती (पीएसी) सदस्यांशी आणि खासदारांशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आमचे संपूर्ण लक्ष राज्याच्या आणि त्याच्या 4.5 कोटी लोकांच्या विकासावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
काही खासदारांची भूमिका गुलदस्त्यात
उपराष्ट्रपती निवडणुकीदरम्यान, सत्ताधारी रालोआ आणि विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्समध्ये तीव्र स्पर्धा आहे. रालोआ आणि इंडिया अलायन्समधील हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. निवडणुकीतून बीआरएस आणि बीजेडीने माघार घेतल्यानंतरही, अकाली दल, झेडपीएम आणि ‘व्हीओटीटीपी’च्या प्रत्येकी एक खासदार आणि तीन अपक्ष खासदारांनी अद्याप आपल्या पसंतीचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.
Comments are closed.