उरणच्या ओएनजीसीत गॅसगळती, 100 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले

ओएनजीसी प्रकल्पात आज दुपारी तीनच्या सुमारास आगडोंब उसळला. जुन्या पाइपलाइनमधून गळती सुरू झाल्याने आग लागली आणि सर्वत्र धुराचे लोट उठले. प्रकल्पातील अंदाजे १०० कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. मात्र या अग्नितांडवामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उरणच्या ओएनजीसी प्रकल्पामध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू असताना दुपारी अचानक पाइपलाइनमधून गॅसगळती सुरू झाली. काही मिनिटातच ही आग पसरल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. ओएनजीसीचे अधिकारी, आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल तसेच सीआयएसएफच्या तुकडीने घटनास्थळी धाव घेऊन पाइपलाइनचे वॉल्व्ह बंद केले. गॅस पुरवठा खंडित होताच अर्ध्या तासातच ही आग आटोक्यात आणण्यास यश आले.
वेगवेगळी कारणे
ओएनजीसी प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना मुख्य अप्पू गेटऐवजी पीरवाडी दर्याच्या बाजूला असलेल्या साऊथ गेटमधून बाहेर पाठवण्यात आले. आगीच्या या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी त्यामागील कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत. ‘मुंबई हाय’कडून येणाऱ्या गॅसवाहिनीला गळती लागल्याने आग लागल्याचे काहींनी सांगितले, तर जुन्या पाइपलाइनला लागलेल्या गळतीमुळे ही आग भडकल्याचा अंदाज अन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
चौकशी करणार
या दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले, तर ओएनजीसी प्रकल्पातील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी उमंग पंड्या यांनी दिली. दरम्यान आगीची घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत आग आटोक्यात आणली. यापुढे अशी घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments are closed.