धामणीचे पाच दरवाजे उघडले, पालघरमधील गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या धो धो पावसामुळे पालघर जिल्ह्यातील धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भरण ओव्हरफ्लो होताच प्रशासनाने या धरणाचे पाचही दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत असून सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कता इशारा दिला आहे.

धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे प्रकल्प प्रशासनाने धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत. सध्या धामणी धरणाची पाणी पातळी ११७.६० मीटर झाली असून धरणातून तब्बल २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे. दरम्यान वीज निर्मितीसाठी धरणातून आणखी १८.४० क्युसेक्स पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. धामणे प्रकल्पाबरोबरच कवडास धरणदेखील काठोकाठ भरले असून पाणी पातळी ६६.३० मीटरवर गेले आहे. गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

धुवांधार पावसाने रस्त्यांची दैना

सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या वेती, वरोती, वाघाडी, कासा, चारोटी, घोळ, पेठ, म्हसाड, नानिवली, आंबेदे आदी गावांसह आजूबाजूच्या पाड्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. नदीकिनारी शेतकाम, मासेमारी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वादळी पावसाने रस्त्यांचीदेखील दैना झाली आहे.

Comments are closed.