आशिया कप 2025: पहिल्यांदा मैदानात उतरणारे 5 नवे चेहरे, क्षणात पलटवू शकतात सामन्याचं चित्र
Asia Cup आशिया कप 2025चा उत्साह सुरू होण्यास आता फक्त काही तास उरले आहेत. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळली जाणार आहे, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ओमान, हाँगकाँग आणि यजमान युएईचे संघ जेतेपदासाठी लढतील. यंदा असे अनेक खेळाडू मैदानावर दिसतील, जे पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळतील. या खेळाडूंनी आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे आणि आता या मोठ्या मंचावर चमकण्यासाठी सज्ज आहेत.
अल्लाह गझनफर – अफगाणिस्तान
अफगाणिस्तान संघ त्याच्या फिरकीपटूंसाठी ओळखला जातो. आता या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे अल्लाह गझनफर. केवळ 18 वर्षांचा हा फिरकीपटू आतापर्यंत मर्यादित आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, परंतु त्याने देशांतर्गत आणि लीग क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 44 टी20 सामन्यांमध्ये 55 विकेट्स घेतल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्याची इकॉनॉमी 7 पेक्षा कमी आहे. तो आशिया कपमध्ये अचानक कोणत्याही फलंदाजाला आश्चर्यचकित करू शकतो.
वरुण चक्रवर्ती – भारत
भारताच्या फिरकी हल्ल्यात वरूण चक्रवर्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. विश्वचषक खेळलेल्या या गोलंदाजाला पहिल्यांदाच आशिया कपमध्ये संधी मिळाली आहे. त्याने 18 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 33 बळी घेतले आहेत. त्याची गुगली आणि व्हेरिएशन फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. गौतम गंभीरच्या रणनीतीत वरुणची भूमिका खूप महत्त्वाची असेल.
कामिल मिश्रा – श्रीलंका
श्रीलंकेचे सर्वांचे लक्ष तरुण फलंदाज कामिल मिश्रा वर असेल. अलिकडेच झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात त्याने 73 धावांची स्फोटक खेळी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मिश्रा वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी करतो आणि पॉवरप्लेमध्ये जलद धावा काढू शकतो.
सॅम अयुब – पाकिस्तान
पाकिस्तानचा युवा फलंदाज सैम अयुब सध्या संघाचे भविष्य मानला जातो. या डावखुऱ्या सलामीवीराने 41 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. ज्यात त्याने 136च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. तो सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव आणतो. याशिवाय, तो गरज पडल्यास अर्धवेळ गोलंदाजी देखील करतो. तो पाकिस्तानसाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो.
रिशाद हुसेन – बांगलादेश
बांगलादेशचा लेग-स्पिनर रिशाद हुसेन पहिल्यांदाच आशिया कप खेळणार आहे. त्याने 42टी20 सामन्यांमध्ये 48 बळी घेतले आहेत. शिवाय खालच्या फळीत मोठे फटके मारण्याची क्षमता देखील त्याच्याकडे आहे. त्याची गोलंदाजी विरोधी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असू शकते आणि फलंदाजीत तो ‘फिनिशर’ची भूमिका बजावू शकतो.
Comments are closed.