आशिया कपच्या सलामीला अफगाणचा मोठा विजय

सेदीकुल्लाह अटलच्या वेगवान आणि अभेद्य 73 धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने उभारलेल्या 189 धावांचा पाठलाग नवख्या हाँगकाँगला झेपलेच नाही. अफगाणी गोलंदाजांनी हाँगकाँगला शंभरीसुद्धा गाठू दिली नाही आणि आशिया कपच्या उद्घाटनीय लढतीत 94 धावांचा मोठा विजय मिळवला. अफगाणच्या जबर आव्हानापुढे हाँगकाँगची फलंदाजी उभीच राहू शकली नाही. बाबर हयात (39) आणि कर्णधार यासिम मुर्तझा (16) या दोघांनाच दोनअंकी धावा करता आल्या. हाँगकाँगचा संघ 20 षटकांत 9 बाद 94 धावाच करू शकला. अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकी आणि गुलाबदीन नईब यांनी दोन-दोन विकेट टिपल्या. त्याआधी सेदीकुल्लाह अटल (73), मोहम्मद नबी (33) आणि अझमतुल्लाह ओमरझई (53) यांच्या खणखणीत खेळींच्या जोरावर अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्ध 6 बाद 188 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. सेदीकुल्लाहने नबीसह 51 तर अझमतुल्लाहसह 82 धावांची भागी रचत अफगाणिस्तानचा विजय निश्चित केला होता.
Comments are closed.